राजापूर : शहरतील प्रभागनिहाय लसीकरणाच्या यशस्वी मोहिमेनंतर आता नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी परदेशात नोकरीनिमित्त जाणाऱ्या नागरिक, शिक्षण व प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचे विशेष नियोजन केले आहे. अशा नागरिक व विद्यार्थ्यांनी थेट नगराध्यक्षांना संपर्क साधून आपली नावनोंदणी करावी, अशी माहिती नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी दिली आहे.
राजापूर शहरातील नागरिकांसाठी प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेचे यशस्वी नियोजन करून शहरातील सर्वच प्रभागांतील ज्येष्ठ नागरिक, महिलांना त्या त्या केंद्रावर लस उपलब्ध करून देत नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी नियोजन केले आहे. शहरातील आठही प्रभागांत राजापूर नगर परिषद व राजापूर ग्रामीण रुग्णालय व आरोग्य विभागाच्या सहकार्यातून ही लसीकरण मोहीम सुरू असून, नागरिक त्याचा लाभ घेत आहेत.
परदेशात नोकरी करणारे नागरिक व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना परत जावयाचे असल्यास त्यांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यांना तत्काळ लस मिळावी या हेतूने पहिला डोस आणि दुसरा डोस लसीकरण मोहिमेचे विशेष नियोजन नगराध्यक्ष अॅड. खलिफे यांनी केले आहे.
नागरिकांनी आपला पासपोर्ट, व्हिसा कॉपी, आधारकार्ड किंवा पॅनकार्डची झेरॉक्स जोडून लसीकरणासाठी नगर परिषदेकडे अर्ज करावयाचा आहे. त्यानंतर तत्काळ अशा नागरिकांसाठी विशेष शिबिर घेऊन त्यांना लस दिली जाणार आहे, असे अॅड. खलिफे यांनी सांगितले.