अडरे : कोरोनाच्या संकटात आपण सापडलो आहोत. त्यामुळे ऑक्सिजनची खरी किंमत आपल्याला कळत आहे. काेरोना महामारीतून बाहेर पडायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या घराशेजारी ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची लागवड करावी. त्यामुळे भविष्यात ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ ओढावणार नाही, असे आवाहन पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी केले आहे.
चिपळूण तालुक्यात निसर्गप्रेमी शौकत मुकादम यांनी विविध ठिकाणी वृक्ष वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यावेळी उपस्थितांना ऑक्सिजन देणारे पिंपळ, वडाच्या झाडाचे वाटप करण्यात आले. पिंपळ व वडाचे झाड दररोज ४० लाख किलो ऑक्सिजन देते, असे त्यांनी सांगितले. काेरोना आणि लाॅकडाऊन यामुळे अनेकांना सध्या मोकळा वेळ आहे. त्याचा सदुपयोग करून आपल्या जागेत अशा वृक्षांची लागवड केल्यास त्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो. अशा उपक्रमांमध्ये ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यायला हवा. येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी ग्रामपंचायतींना लेखी आदेश दिले असून, वृक्ष रोपे खरेदी करून गावांमध्ये वाटप करायच्या सूचना दिल्या आहेत़ त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे गरजेचे आहे, असे शौकत मुकादम यांनी सांगितले.