मोफत आरोग्य शिबिर
आरवली : धामापूरतर्फे संगमेश्वर येथील सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या आपली पंचक्रोशी, निरोगी पंचक्रोशी उपक्रमांतर्गत धामापूरतर्फे संगमेश्वर गावात वालावलकर रूग्णालय, डेरवणच्या माध्यमातून शून्य ते १४ वयोगटातील मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुलांची मोफत तपासणी करण्यात आली.
काेंढेतड येथे लसीकरण
राजापूर : तालुक्यातील फुफेरे आरोग्य केंद्रातर्फे कोंढेतड प्राथमिक शाळेमध्ये १६० ग्रामस्थांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. सरपंच मनाली तुळसवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. यावेळी दामोदर गाडगीळ, वैद्यकीय अधिकारी अश्विनी निडसोसे, आरोग्य सहायक विद्या तांबे आदी उपस्थित होते.
बीएसएनएल सेवा ठप्प
राजापूर : तालुक्यातील भू येथील भारत संचार निगमचा टाॅवर बंद असल्याने परिसरातील शासकीय सेवा ठप्प झाली आहे. शासकीय कार्यालये, शाळा, बँकांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. ऑनलाईन अध्यापन सुरू असून सेवा ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तातडीने टाॅवर कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.
महावितरणतर्फे कृषी जोडण्या
रत्नागिरी : अतिवृष्टी, चक्रीवादळ, कोरोना आदी संकटांवर मात करीत नवीन तंत्रज्ञानाच्या रोहित्रांचे मर्यादित उत्पादन यासह अनेक अडथळ्यांवर मात्र करीत महावितरणने उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून कोकण प्रादेशिक विभागात ३१ हजार ५४९ पैकी २४ हजार ९३४ जोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. उर्वरित ४० हजार २५२ वीज जोडण्यांचे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे.
बाजारात गर्दी
रत्नागिरी : वीकेंड लाॅकडाऊन असतानाही शहरात शनिवार, रविवारी खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. कपड्यांच्या दुकानात मान्सून सेल लावण्यात आले असून खरेदीसाठी ग्राहक रांगा लावत आहेत. रामआळी रस्त्यावर छोटे विक्रेते दुकाने लावत असून रस्त्यातून पादचाऱ्यांना चालणे अवघड बनले आहे. गर्दी पाहून कोरोना संपल्याचा प्रत्यय येत आहे.
पोषण आहाराची मागणी
रत्नागिरी : काेराेना काळात पोषण आहार धान्य स्वरूपात न देता त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे शासनाने घोषित केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे बँक खाते काढण्याचे काम जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे. १५० रूपयांसाठी एक हजार रूपयांचे खाते काढावे लागत असल्याने पालकांना भुर्दंड बसत असल्याने पोषण आहार धान्य स्वरूपात देण्याची मागणी होत आहे.
खड्ड्यांचे साम्राज्य
आरवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरातील सोनवी, शास्त्री, बावनदी पुलावर खड्डे पडले आहेत. वाहन पुलावरून जाताना परिसराला हादरे बसत आहेत. पुलाचे काम सुरू असले तरी खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
कोविड केंद्राला साहित्य भेट
देवरूख : फाॅरवर्ड सिमेन्स युनियन ऑफ इंडियातर्फे कसबा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील कोरोना केंद्राला तीन ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आले आहेत. संघटनेचे सेक्रेटरी सुशील देवरूखकर, उपाध्यक्ष नियाज कापडी, इब्राहिम काझी यांच्या हस्ते सिलिंडर भेट देण्यात आले.
चित्रकला स्पर्धेत यश
खेड : जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत भरणे-बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यती खेडेकर, त्रिवेणी गमरे यांनी प्रथम तर अनन्या दोंडे हिने तृतीय क्रमांक मिळवला. मानसी देवघरकर, गुरूप्रसाद देवघरकर , दर्शना दांडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थी पालकांना दिलासा
रत्नागिरी : कोरोना नसलेल्या गावात शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली असली तरी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या कमी होत असली तरी धोका टळलेला नाही, त्यामुळे तूर्तास शाळा सुरू होऊ शकत नसल्याचे सूचित केल्याने विद्यार्थी, पालकांना दिलासा प्राप्त झाला आहे.