लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथील चंद्रकांत विठ्ठल रानडे पारंपरिक पध्दतीने शेती करीत असताना प्रयोगशील वृत्तीमुळे सतत नवनवीन प्रयोग करीत आहेत. सेंद्रिय पध्दतीने लागवडीबरोबर कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न मिळविण्याचा त्यांचा ध्यास आहे. त्यासाठी त्यांना कृषी विभागाचेही मार्गदर्शन लाभत आहे.
एक हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली असून त्यासाठी जपानी तंत्राचा अवलंब केला आहे. सहा इंचाची आडवी रेेषा तर एक फुटाचे उभ्या रेषेचे अंतर ठेवून लागवड केली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाताला चांगले फुटवे आले आहेत. वाढ चांगली झाली असून, उत्पादनही चांगले होईल, असा त्यांचा अंदाज आहे. लागवडीच्या रेषेतील अंतरामुळे उगवलेले तण नियंत्रणासाठी स्वत: कोळपणी यंत्र तयार केले आहे. कोळवणीवेळी रोपांची मुळे हलतात, वाढ जोमदार होते. दरवर्षी तीन ते साडेतीन हजार किलो भात उत्पादन लाभते. यावर्षी उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
रासायनिक व सेंद्रिय शेतीचे प्रयोग
एक हेक्टर क्षेत्रावर जपानी पध्दतीने भात लागवड केली असून त्यासाठी मर्यादित खतांचा वापर करीत आहेत. दीड गुंठे क्षेत्रावर मात्र शंभर टक्के सेंद्रिय पध्दतीने भात लागवड केली आहे. दोन्ही पध्दतीने लागवड केलेली शेती उत्तम असून, भाताचे फुटवे येण्याच्या तयारीत आहेत. कोणत्या क्षेत्रातून किती उत्पन्न लाभते यावर पुढील कल असणार आहे. भाताबरोबर आले, हळद लागवडही सेंद्रिय पध्दतीने केली आहे. भातानंतर भाजीपाला, कुळीथ, वाल, उडीद, मिरची, उन्हाळी भात लागवड करत असून अजित व अतुल या दोन्ही मुलांचे सहकार्य लाभत आहे.
उन्हाळी भात
उन्हाळी शेतीत भात लागवड करीत असून कमी दिवसांचे वाण लागवड केले जाते. यावर्षी १२० दिवसांचे ‘मधुमती’ वाण लागवड करण्यात येणार आहे. चांगले उत्पन्न देणारे शिवाय बासमतीप्रमाणे भाताला सुगंध आहे. मोदक पीठ तसेच मऊ भातासाठी याचा वापर सर्वाधिक केला जात असल्याने यावर्षी याच वाणाच्या लागवडीचा निर्णय घेतला आहे.
बाणवलीची रोपे
नारळ बागायती असून, स्वत: बाणवलीच्या चांगल्या फळापासून रोपे तयार करीत आहेत. त्यांच्याकडील रोपे चांगल्या दर्जाची आहेत. त्यामुळे लागवडीनंतर चार ते पाच वर्षात फळे येत असल्याने त्यांच्याकडील रोपांना विशेष मागणी आहे. खाडीचे पाणी भरणाऱ्या क्षेत्रात नारळ लागवड केली आहे. उत्तम नियोजनामुळे उत्पन्न सुरू झाले आहे.
आंबा उत्पादन
आंबा लागवड असून वर्षाला १५० ते २०० पेट्या आंबा विक्री करतात. आंब्यासाठीही कमीत कमी रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर केला जात आहे. बागेत दोन गांडूळ खत युनिट तयार केली असून गांडूळ खत व शेणखताचा वापर सर्वाधिक करून सेंद्रिय शेतीवर भर असल्याने दर्जा व उत्पन्न चांगले आहे.