रत्नागिरी : ज्या जिल्ह्यातील नाटक प्रथम तेथे पुढील वर्षीच्या स्पर्धांची प्राथमिक फेरी घेण्यात येते. गतवर्षीच्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत ‘राधाकृष्ण कलामंच’च्या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यामुळे यावर्षीच्या स्पर्धा रत्नागिरी केंद्रावर होणे अपेक्षित होते. परंतु रत्नागिरीचे केंद्र कोल्हापुरात हलविण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध म्हणून येथील नाट्यप्रेमींनी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर ठाण मांडून आंदोलन केले.राज्य कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी संगीत राज्य नाट्य स्पर्धा घेण्यात येते. गतवर्षी ही स्पर्धा सांगली येथे घेण्यात आली. त्यात रत्नागिरीच्या राधाकृष्ण कलामंचने प्रथम क्रमांक मिळवला होता.
प्रशासनाच्या नियमानुसार रत्नागिरी केंद्रावर संगीत नाट्य स्पर्धा होणे आवश्यक होते. मात्र, नियमाला फाटा देत प्रशासनाने स्पर्धा रत्नागिरीऐवजी कोल्हापुरात घेण्याची तयारी केल्याने रत्नागिरीतील नाट्यरसिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.
येथील रसिकांना संगीत नाटकांना मुकावे लागणार आहे, असे सांगण्यात आले. यावेळी मनोहर जोशी, समीर इंदुलकर, आसावरी शेट्ये, नंदू जुवेकर यांच्यासह अनेक रंगकर्मी उपस्थित होते.