लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना रुग्णवाढीमुळे जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी पाचवी ते बारावीपर्यत पहिले सत्र ऑनलाईन तर दुसऱ्या सतात प्रत्यक्ष अध्यापन करण्यात आले. मात्र, पहिली ते चौथीपर्यत अध्यापन ऑनलाईनच सुरू होते. कोरोनामुळे पहिलीमध्ये गतवर्षी १३ हजार ९०७ विद्यार्थ्यांचा प्रवेश नोंदविण्यात आला होता. कोरोनामुळे स्वागतही ऑनलाईन झाले. त्यामुळे मुले शाळेत न जाता, परीक्षा न देताच दुसरीच्या वर्गात गेली आहेत. विद्यार्थ्यांची शाळा पूर्वतयारी करण्यासाठी ‘पहिलं पाऊल’ हा उपकम दि.१५ एप्रिल ते दि.१५ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आणि प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यात १३,९०७ बालकांनी पहिलीत प्रवेश घेतला आहे. त्यात सहा हजार ८७८ मुली तर ७ हजार २९ मुलांचा समावेश आहे. मात्र, पहिलीच्या वर्गात न बसताच दुसरीत व दुसरीतून तिसरीत जाणारे विद्यार्थी अशा तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना शाळा पूर्वतयारी करण्यासाठी नऊ आठवड्यांचे नियोजन करण्यात येणार आहे.
शालेय जीवनात लहान मुलांचे पहिले पाऊल दमदार व तयारीसह असण्याची खात्री करणे. मुलांना शाळा व शिक्षणाविषयी आवड निर्माण करणे. मुलांवरील अदृश्य दबाव दूर करणे. पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांना प्रोत्साहित करणे. मुले व पालकांचा आत्मविश्वास वाढविणे. मुलांना स्वत:चे नाव, पत्ता आजूबाजूचा परिसर याबाबत बोलायला शिकविणे. मुलांना अक्षर व अंकओळख करून देणे. पहिलीतील प्रवेश सुकर व आनंददायी होणार आहे. विद्याथ्यार्ची शारीरिक, मानसिक जडणघडण करणे. मुलांच्या सामान्यज्ञानात भर टाकण्यात येणार आहे. जेणेकरून जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या टिकवून ठेवण्यास यामुळे मदत होणार आहे.
..............................
कोरोनामुळे गतवर्षी पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव झाला नाही. गतवर्षी पहिलीतील दुसरीत व दुसरीतील तिसरीत विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पास करण्यात आले आहे. आनंददायी प्रवेश उपक्रमामुळे विद्यार्थ्यांवर प्रवेशाचे मानसिक दडपण दूर होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील सर्वच माध्यमांच्या शाळांमधील ४० ते ४५ विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम लाभदायी ठरणार आहे.
- एस. जे. मुरकुटे, उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, रत्नागिरी