मनोज मुळ्येरत्नागिरी : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत रोज मोठी भर पडत असल्याने वाढलेला तणाव आता ऑक्टोबरमध्ये खूप अंशी निवळला आहे. आता रुग्णसंख्या घटली असून, कोरोनामुक्तीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्ह्यातील लोकांनाही दिलासा मिळाला आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात ८,४१८ रुग्णांपैकी ७,७९८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. हे प्रमाण आता ९२.६३ टक्के इतके झाले आहे.अजूनही लस सापडलेली नसल्याने कोरोनावर नेमका इलाज सापडलेला नाही. मात्र, तरीही आरोग्य यंत्रणेकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमुळे कोरोनातून पूर्ण बरे झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण मात्र सातत्याने कायम राहिले आहे.मार्च महिन्यात जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळला. पहिल्या काही दिवसात जिल्ह्यात सहा रुग्ण आढळले. मात्र, हे रुग्ण लवकर बरेही झाले. त्यानंतर जवळपास १५ दिवस जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र त्यानंतर रुग्ण झपाट्याने सापडू लागले.
ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सवादरम्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. हा महिना आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे पहिले १८ दिवस या काळात रुग्ण वाढीचा वेग खूप मोठा होता. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पहिल्यापासून कायम आहे. आता रुग्णसंख्या घटल्याने कोरोनामुक्तांचा टक्का वाढला आहे.ऑगस्टमध्ये मुक्ती कमीचऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव काळात रुग्णसंख्या वाढण्याचा वेग खूप मोठा होता. त्यावेळी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्यपूर्ण होती. मात्र रुग्ण वाढल्यामुळे बरे होणाऱ्यांचे प्रमाण खूपच घटल्यासारखे दिसत होते. हे प्रमाण ६८.५ टक्के इतके कमी झाले होते. मात्र सप्टेंबरपासून ते वाढतच गेले आहे.तब्बल ३७४ कोरोनामुक्तसप्टेंबर महिन्याच्या १९ तारखेपासून रूग्ण घटले आणि कोरोनामुक्त वाढत गेले. २४ सप्टेंबरला कोरोनामुक्तीचे प्रमाण ७६.७६ टक्के इतके होते. मात्र २५ सप्टेंबरला एकाच दिवसात विक्रमी ३७४ रुग्ण बरे झाले. त्यामुळे कोरोनामुक्तांचे प्रमाण चार टक्क्यांनी वाढून ८०.७९ टक्के इतके झाले.दुसऱ्यांदा होऊ शकतोजे एकदा कोरोनामुक्त झाले आहेत, त्यांना नियमित काळजी घ्यावी लागणार आहे. अनेकांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यात कोरानाची लक्षणे अधिक तीव्र दिसून आली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.