रत्नागिरी : पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत वाढवून मिळावी, या समविचारी मंचच्या मागणीला अखेर यश आले असून या योजनेला २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत १५ मेपर्यंत ग्राह्य धरल्याने त्याचा फटका तौक्ते वादळातील हानी झालेल्या कोकणातील आंबा व्यावसायिकांना बसला होता. नेमलेली मुदत वाढवावी अन्यथा आंदोलन करण्याची तयारी महाराष्ट्र समविचारी मंचचे प्रमुख बाबा ढोल्ये, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष अनिल नागवेकर, रघुनंदन भडेकर, नीलेश आखाडे मनोहर गुरव, आदींनी केली होती. कोरोना निर्बंध काळात आंदोलन थांबविण्यात आले असले तरी या सर्वांनी केंद्र शासनापर्यंत आपला पत्रव्यवहार सुरूच ठेवला होता. याबाबत खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांना निवेदन पाठविण्यात आले.
सहस्त्रबुद्धे यांनी याची दखल घेण्याची ग्वाही समविचारी मंचच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्याप्रमाणे संबंधित वरिष्ठ स्तरावर प्रयत्न झाल्याने सहस्त्रबुद्धे यांच्या प्रयत्नाने तसेच महाराष्ट्र समविचारी मंचच्या मागणीने पंतप्रधान पीक विमा योजनेला दि. २३ जुलैपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत तालुकाध्यक्ष अनिल नागवेकर यांनी जातीने लक्ष घालून प्रयत्न केले.