रत्नागिरी : रामटेक (नागपूर) येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे शनिवार दि. २५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन उद्घाटन हाेणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री ॲड. अनिल परब, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.
कविकुलगुरु कालिदास विश्वविद्यालयाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. कुलसचिव डॉ. हरेकृष्ण अगस्ती, वित्त व लेख अधिकारी डॉ. रामचंद्र जोशी, गुरुकुलचे संचालक प्रा. पराग जोशी आणि रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे उपस्थित राहणार आहेत.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून एकमेव संस्कृत विद्यापीठाचे पहिले उपकेंद्र रत्नागिरीत आकाराला येत आहे. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती भागात विद्यापीठाचे उपकेंद्र उभारले जात आहे. २०,००० चौरस फुटांहून अधिक परिसरात संगणक लॅब, डिजिटल क्लासरूम, यासह योग कक्ष आदी अनेक सोयी या केंद्रात असणार आहेत. लवकरच उपकेंद्राचे स्वतंत्र भवनही साकार होणार आहे.
खासदार विनायक राऊत, खासदार सुनील तटकरे, आमदार ॲड. निरंजन डावखरे, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, आमदार प्रसाद लाड, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, राज्य उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक धनराज माने यांचीही उपस्थिती कार्यक्रमासाठी लाभणार आहे.
या ऑनलाईन कार्यक्रमासाठी नागरिकांनी ऑनलाईन उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ. हरेकृष्ण अगस्ती आणि रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे.