चिपळूण : अनेकवेळा समज देऊनही दुकाने उघडी ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर चिपळूण पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. शुक्रवारी दिवसभरात पोलिसांनी सात व्यापाऱ्यांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले. त्यामध्ये चिपळूण शहर आणि ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांचा समावेश आहे. तसेच वाहनांवरही धडक कारवाई केली जात आहे.
लॉकडाऊनकाळात अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ७ ते ११ या वेळेत मुभा देण्यात आली आहे, तर अन्य दुकान पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तरीही सकाळी ११ नंतर काहीजण दुकानाचे शटर बंद करून मागील दराने ग्राहकांना दुकानात घेऊन व्यापार करत असल्याचे निदर्शनास येत असल्याने पोलिसांनी थेट कारवाईचे सत्र सुरू करून अनेक व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. ग्रामीण भाग आणि बाजारपेठेत पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांची गस्त सुरू असताना काही दुकानात विक्री सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी अनिल सदाशिव देवरूखकर (अलोरे), मंदार प्रकाश चव्हाण (कादवड), अश्रफ इस्माईल मुकादम (खेर्डी), शशिकांत गजानन भुरण (खेर्डी), अंकुश सीताराम कदम (पिंपळी), अशोक नारायण मुळे (पेठमाप), सानवी संकेत मोरे (कोंढे) या सात व्यापाऱ्यांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पाेलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ हे गस्त आणि कारवाई करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या दुसऱ्या टीमकडून विनाकारण, विनाहेल्मेट फिरणाऱ्यांवर व वाहनधारकांवर कारवाईचे सत्र सुरू ठेवण्यात आले आहे.