लांजा : प्रवांशाकडे ई-पास नसतानाही, तसेच प्रवाशांचे ऑक्सिजन लेव्हल, पल्स रेट तपासणीचे साहित्य नसतानाही प्रवाशांना पाचल (ता. राजापूर) ते मुंबई येथे घेऊन जाणाऱ्या तीन आराम बसच्या चालकांवर साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याच्या अनुषंगाने लांजा पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे.
लांजा कोर्ले फाटा येथे शनिवारी सायंकाळी लांजा पोलिसांनी नाकाबंदी केली असता पाचळ राजापूर ते मुंबई अशी प्रवासी घेऊन जाणारी रिया ट्रॅव्हल्स आराम बस (एमएच ०१, सीआर ८६८५) चालक कुंदन पांडुरंग तेलंग (३२, रा. पाचल नारकरवाडी) या गाडीतून २३ प्रवासी घेऊन पाचल ते विरार असे जात होता, तसेच सचिन सुरेश सरवणकर (३८, रा. पाचल बाजारवाडी) हा आपल्या ताब्यातील विष्णू ट्रॅव्हल्स (एमएच ४६, बीएम २६९०) पाचल ते बोरिवली असे ६ प्रवासी घेऊन जात हाेता, तसेच सतीश लक्ष्मण विचारे (३२, रा. वाशी मुंबई), प्रभाकर सीताराम घाणेकर (३५, रा. जाकादेवी-रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील सुगंधा ट्रॅव्हल्स (एमएच ४८, एके ४९०८) हे पाचल ते विरार, असे १८ प्रवासी घेऊन जात हाेते. कोर्ले फाटा येथे नाकाबंदी करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासणी केली. त्यावेळी ई-पास नव्हता, तसेच चालकाकडे प्रवाशानचे पल्स रेट, ऑक्सिजन लेव्हल तपासणीचे साहित्यही नव्हते.
या तिन्ही खासगी आराम बस चालकांना घेऊन लांजा पोलीस स्थानकात आणून जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे पारित केलेल्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून स्वत:कडे, तसेच लक्झरी बसमधील प्रवाशांकडे ई-पास नसताना आपल्या ताब्यातील खासगी बसमधून प्रवाशांना घेऊन जात होता, म्हणून त्यांच्यावर शनिवारी रात्री उशिरा लांजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.