रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाची जनादेश यात्रा मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सायंकाळी रत्नागिरीत येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी भव्य मंडप नागपूरच्या ठेकेदाराने उभारला असून, या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे. मारुती मंदिर येथे शिवाजी स्टेडियमकडे जाणाऱ्या नाक्यावरील दुभाजक खुले करण्यात आले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी भाजपकडून करण्यात आली आहे. आडिवरे, पावस, जयस्तंभ येथे जनादेश यात्रेचे जल्लोेषी स्वागत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री व जनादेश यात्रेच्या स्वागताचे फलक सर्वत्र झळकलेले आहेत.मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी मार्गातील अडथळे, खड्डे दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते, महावितरण व पालिका प्रशासनाने या दौऱ्यासाठी पुरेशी काळजी घेतली आहे.जिल्ह्यात भाजपचे गतवैभव पुन्हा आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी ठरणार आहे. कोकणच्या विकासाकरिताही त्यांनी अनेक योजना सुरू केल्या. त्यामुळे राज्यात पुन्हा फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सत्ता संपादन करण्यासाठी जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्ते चांगल्या प्रकारे योगदान देतील, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.
जनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक सोमवारी रत्नागिरीत झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीची सभा मोठ्या उपस्थितीने विक्रमी करूया, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा स्वागताध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी या बैठकीत केले. मुख्यमंत्र्यांनी कार्यक्षम, लोकाभिमुख प्रशासन दिले. राजकीय प्रश्न, शेतकरी आंदोलन, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मराठा आंदोलन असे सर्व प्रश्न कार्यकुशलतेने सोडवले. याकरिता कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठबळ दिले पाहिजे.यावेळी महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनीही मार्गदर्शन केले. या सभेला बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अशोक कदम, डॉ. अलिमियॉ परकार, मुन्ना सुर्वे, जयंत देसाई, अॅड. प्रदीप नेने, सीए भूषण मुळ्ये, सीए श्रीरंग वैद्य, अॅड. विजय साखळकर, प्रवीण लाड, राजन मलुष्टे, अॅड. फजल डिंगणकर आदी मान्यवर उपस्थित होते.