देवरुख : सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. त्यामुळे पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सध्या जोरदार मोहीम सुरू झाल्याने नागरिकांनी कारवाईचा धसका घेतला आहे. त्यामुळे आता येता-जाता मास्क लावणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
बोर्डाच्या बाजूलाच कचरा
रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीत कचरा टाकू नये, असे फलक लावण्यात आले आहेत; परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत नागरिक बेजबाबदारपणे फलकाच्याच बाजूला कचरा टाकत आहेत. अनेक भागात सध्या हे चित्र दिसत आहे. उन्हाळा वाढल्याने या कचऱ्याची दुर्गंधीही येत आहे.
कॉलनीत पाणीटंचाई
रत्नागिरी : येथील एसटी कॉलनीत गेल्या आठ दिवसांपासून नियोजित वेळी पाणी येत नसल्याने या कॉलनीतील चालक - वाहकांच्या कुटुंबीयांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे पाणी योग्यवेळी उपलब्ध करण्यात यावे, अशी मागणी या चालक - वाहकांच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
कोंडवाड्याची मागणी
रत्नागिरी : सध्या शहरात मोकाट जनावरांची समस्या अधिकाधिक वाढू लागली आहे. ही मोकाट जनावरे भर रस्त्यातून रात्री-अपरात्री भटकत असल्याने अपघाताचा धोकाही वाढला आहे. ही जनावरे ग्रामीण भागात उन्हाळी भाजीपाला आणि शेतीत जाऊन फस्त करू लागल्याने गावांमध्येही आता कोंडवाड्याची मागणी केली जात आहे.
वाळू उपशाकडे दुर्लक्ष
दापोली : फरारे खाडीत वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. फरारे गाव हे दुर्गम ठिकाणी आहे. तिथे कुठल्याच मोबाइलला नेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही. निर्मनुष्य ठिकाणी असल्याने या खाडीत दररोज शेकडो ब्रास वाळूचे उत्खनन केले जात आहे. त्यामुळे सरकारचा महसूल बुडत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या अवैध धंद्याला ऊत आला आहे.
लॉकडाऊनची धाकधूक
लांजा : शासनाने शुक्रवारी रात्रीपासून लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन होणार की काय? या भीतीने नागरिकांमध्ये आता चर्चा होत आहे. संसर्ग वाढल्याने शासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातही हा निर्णय झाला तर काय? करायचे अशी चिंता नागरिकांना सतवत आहे.
नेटवर्कचा अडथळा
देवरुख : अनेक रुग्णालयांत सध्या लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी नेटवर्कमध्ये अडचण येत असल्याने लसीकरणाचा वेग मंदावत आहे. अनेक प्राथमिक केंद्रांना सध्या नेटवर्कचा मोठ्या प्रमाणावर अडथळा होत असल्याने लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना थांबून राहावे लागत आहे.
विकासकामांचे भूमिपूजन
दापोली : तालुक्यातील महाळुंगे ग्रामपंचायत कार्यालयाचा भूमिपूजन समारंभ आणि गोपाळवाडी ते स्मशानभूमी रस्ता डांबरीकरण कामाचा प्रारंभ नुकताच करण्यात आला. माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
सुटकेचा नि:श्वास
गुहागर : गेल्या दोन महिन्यांपासून मार्चअखेरच्या कामांची बिले खर्ची करण्यासाठी सर्वच कार्यालयांची धावपळ सुरू होती. गेला महिनाभर तर सुट्या असूनही कर्मचारी कामावर येत होते. गेल्या आठवड्यात मार्च एंडिंगची कामे पूर्ण करण्यासाठी कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करीत होते. अखेर मार्च संपल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी
रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. रात्री आठ वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश असतानाही काही दुकानदार उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवत आहेत. त्यामुळे नागरिकांची गर्दी अशा दुकानांसमोर होत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.