चिपळूण : शहरात नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू असतानाच आता ग्रामीण भागातही पोलिसांनी थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील मार्गताम्हाणे आणि मालघर तसेच शहरातील पेठमाप आशा तीन व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र काही व्यापारी समोरचे शटर बंद करून किंवा अर्धवट ठेवून व्यापार करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. प्रथम त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. दुसऱ्यांदा कारवाईचा इशारा देण्यात आला. मात्र तरीही काही व्यापारी नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसल्यानंतर पोलिसांनी बाजारपेठेत सतत गस्त सुरू केली आणि नियम मोडणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू केले.
चिपळूण शहर बाजारपेठेत गेले आठवडाभर ही कारवाई सुरू आहे. आता पोलिसांनी ग्रामीण भागाकडेही लक्ष केंद्रित केले असून, तेथेही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथे सौरभ चंद्रकांत चव्हाण यांनी आपले दुकान दुपारी १.३० पर्यंत उघडे ठेवल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालघर निर्व्हाळ फाटा येथे मयूर राजाराम महाडिक यांनीही नियम मोडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण शहरातील पेठमाप येथे प्रकाश श्रीकृष्ण शिरगावकर यांच्यावरही नियमभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.