चिपळूण : चिपळूण पोलीस स्थानकातील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांची रायगड येथे बदली झाली आहे. त्यांच्या बदलीचा आदेश मंगळवारी उशिरा प्राप्त झाला.
देवेंद्र पोळ यांनी चिपळूण पोलीस स्थानकाचा कारभार सांभाळताना अनेक गुन्ह्यांची उकल केली. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या नगर परिषद प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांच्या खून प्रकरणाचा तपास करताना पोळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय, दोन महिन्यांपूर्वी शहरातील भोगाळे येथे परिचारिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणीदेखील त्यांनी तातडीने तपास केला होता. त्यामुळेच संशयित आरोपी काही तासांमध्येच पोलिसांच्या हातात सापडला. त्याची दखल घेत सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुकही केले.
चिपळूण परिसरातील अनेक घरफोड्या, चोऱ्या व अन्य गुन्ह्यांतील आरोपींचा छडा त्यांनी लावला आहे. शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अनेकवेळा ते रस्त्यावर उतरले. कोरोना व महापुराच्या काळात त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे.