खेड : धावत्या रेल्वेमधून पडून ४५ वर्षीय पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना कोकण रेल्वे मार्गावरील सुकिवली गोपाळवाडीनजीक घडली. उमेश पांडुरंग भोसले (४५, रा. टेटवली, ता. दापोली) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना काल, रविवारी घडली.कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या सर्वच गाड्यांना गर्दी होत आहे. त्यामुळे मिळेल ती जागा पकडून प्रवाशी प्रवास करत आहेत. या मार्गावरील रत्नागिरी - दिवा पॅसेंजर गाडीतून मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असलेले उमेश भोसले रविवारी प्रवास करत होते. गाडीला गर्दी असल्याने ते दरवाजाजवळ उभे होते.खेड स्थानकातून ही गाडी दिवा स्थानकाकडे जाण्यासाठी निघाली. गाडी सुकिवली - गोपाळवाडीनजीक आली असता धावत्या गाडीतून उमेश भोसले यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. हा प्रकार सोबत असलेल्या प्रवाशांच्या लक्षात येताच सुकिवलीनजीक गाडी थांबवण्यात आली.या घटनेची माहिती पोलीस व मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मदत कार्य केले. जखमी झालेल्या भोसले यांची ओळख पटवून त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक बनल्याने अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले.
धावत्या रेल्वेतून पडून पोलीस कर्मचारी गंभीर जखमी, रत्नागिरी-दिवा पॅसेंजर मधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 2:11 PM