राजापूर : ताेक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लांजा उपविभागातील देवरूख, लांजा, राजापूर व नाटे पोलीस स्थानकांतर्गत आपत्कालिन उपाययोजना म्हणून पोलिसांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत जनतेला सहाय्य केले. यामध्ये देवरुख पोलीस स्थानकाच्या हद्दीत देवरूख शहरात पंचायत समितीसमोर तसेच साखरपा ते देवरूख मार्गावर पडलेली झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
लांजा पोलीस स्थानकाचे हद्दीत जावडे रोड आग्रे हॉलशेजारील रस्त्यावर पडलेली झाडे काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. राजापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत डोंगर ते सागवे जाणाऱ्या रस्त्यावर झाड पडले होते. हे झाड जेसीबीद्वारे काढून वाहतूक तत्काळ सुरु करण्यात आली आहे. तर नाटे पोलीस स्थानक हद्दीत चक्रीवादळाचे अनुषंगाने सागर किनाऱ्यालगत ज्या लोकांची कच्ची घरे आहेत, त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. वादळामुळे रस्त्यावर पडलेली झाडे तत्काळ हटविण्यात आली आहेत. तसेच सागर रक्षक दल व ग्राम रक्षक दल कार्यान्वित करण्यात आले असून, वादळाच्या अनुषंगाने घडणाऱ्या घटनांची माहिती घेऊन वेळीच उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.