तन्मय दाते
रत्नागिरी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये आणि सण, उत्सव शांततेत साजरा व्हावा, यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे गावोगावी अधिकारी व अंमलदारांच्या माध्यमातून जनजागृती बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्थांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा उत्सव आहे. या निमित्ताने मुंबईसह विविध ठिकाणी असणारे कोकणवासीय मोठ्या संख्येने गावी येत असतात. गतवर्षी कोरोनामुळे घालण्यात आलेल्या विविध निर्बंधामुळे अनेकांना गावी येता आले नव्हते. मात्र, यंदा कोकण रेल्वे आणि एस.टी. महामंडळाने मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने चाकरमानी गावी येण्यास सज्ज झाले आहेत. मात्र, यामुळे कोरोनाच्या साथ रोगामध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने खबरदारी घेण्यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहीतकुमार गर्ग यांच्या निर्देशानुसार पोलीस अधिकारी व अंमलदार गावोगावी जाऊन जनजागृतीसाठी बैठका घेत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पोलीस दलाने गाव दत्तक योजनेचा उपयोग पोलीस दलाला यानिमित्ताने होत आहे. या व्यवस्थेमुळे लोकांपर्यंत थेट पोहोचून कोरोनाच्या बाबतीत घ्यावयाची खबरदारी तसेच सण,उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात येत आहेत, तसेच शासनाने या उत्सवावर घालून दिलेल्या निर्बंधाची माहिती दिली जात आहे. गावागावात जाऊन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे व वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने व अन्य पोलीस अधिकारी, अंमलदार जनजागृती करीत आहेत.