रत्नागिरी : शहरात पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी सुरु असून, ८०१ उमेदवारांची चाचणी झाली. त्यामध्ये ७५० उमेदवार उत्तीर्ण झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता.जिल्हा पोलीस दलामध्ये आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरु आहे. ही भरती १९४ रिक्त पदांसाठी होणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरु झाली असून २८ मार्च, २०१८पर्यंत सुरु राहणार आहे. मैदानी चाचणीमध्ये गोळाफेक, लांबउडी, पूलअप्स, १०० मीटर व १६०० मीटर धावणे आदींचा समावेश करण्यात आला आहे.पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर ही भरती सुरु असून, त्यासाठी एकूण २९ हजार ४९० उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज केले होते. त्यामध्ये प्रत्येक दिवशी २ हजार उमेदवारांची मैदानी चाचणी करण्याचे पोलीस दलाकडून नियोजन करण्यात आले आहे.
मात्र, पहिल्या दिवशी आज सोमवारी मैदानी चाचणीसाठी ८०१ उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी ५१ उमेदवार उंची, छाती यामध्ये अपात्र ठरले आहेत. या भरतीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, चीप अशा अत्याधुनिक साहित्यांचा वापर करण्यात आला आहे. भरतीसाठी या मार्गावरील वाहतूकदेखील बंद करण्यात आली आहे....तर पोलिसांना सांगाभरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी मैदानावर मोबाईल फोन आणू नयेत. तसेच भरतीसाठी आलेल्या उमेदवारांकडे कोणीही पैशाची मागणी केल्यास किंवा पैसे घेऊन शिफारस करतो, असे सांगितल्यास त्याची माहिती टोल फ्री क्रमांक १०६४ वर द्यावी, असे आवाहन पोलीस दलाने केले आहे.