रत्नागिरी : रत्नागिरीतील गुंतवणूकदारांची सुमारे दहा कोटींची फसवणूक करणाऱ्या सॅफरॉन कंपनीबाबत विशेष पथकामार्फत कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी ‘सॅफरॉन’चा सूत्रधार शशिकांत राणे याच्या अनेक मालमत्ता पोलिसांनी शोधून काढल्या आहेत. सॅफरॉनच्या योजनांचा लाखो रुपयांचा लाभ घेणाऱ्या सुरुवातीच्या गुंतवणूकदारांचीही चौकशी केली जाणार असल्याचे संकेत विशेष पथकाकडून मिळत आहेत.गेल्या आठ वर्षांच्या काळात रत्नागिरीसह मुंबई, गोवा, सिंधुदुर्ग या भागांत सॅफरॉन कंपनीच्या नावाने शशिकांत राणे याने जाळे विणले. त्यात लाखो रुपये गुंतवणारे अनेक गुंतवणूकदार चांगलेच अडकले आहेत. सुरुवातीला सहापट, सातपट लाभ घेणारे अनेक गुंतवणूकदार असून, त्यानंतर ज्यांनी या कंपनीत पैसे गुंतवले, ते पूर्णत: फसले आहेत. दामदुप्पट लाभ दूरच राहिला असून, मुद्दलही हाती आलेली नाही. अशा असंख्य गुंतवणूकदारांची फसवणूक राणेने या कंपनीमार्फ त केली असून, रत्नागिरी शहर पोलिसांत त्याच्याविरोधात ३००पेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत, तर फसवणुकीची रक्कम १० कोटींवर गेली आहे.ज्यांनी ‘सॅफरॉन’मध्ये सुरुवातीला गुंतवणूक करून सहा किंवा सातपट लाभ घेतला आहे, त्यांना मिळालेले पैसे हे सध्या ज्यांचे पैसे बुडाले आहेत, त्यांचेच असून, सुरुवातीचे लाभधारक हे त्यामुळे गुन्हेगारच ठरतात, असा पोलिसांचा दावा आहे. या सर्व लाभधारकांची नावे व त्यांना मिळालेली रक्कम याची जंत्रीच पोलिसांकडे आहे. त्यामुळे या सर्व व्यक्ती आता लवकरच तपासाच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे. या सर्वांची कसून चौकशी होऊ शकते, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)शशिकांत राणेच्या अनेक मालमत्ताकोट्यवधी रुपयांची झालेली फसवणूक काहीअंशी भरून निघावी, यासाठी पोलिसांनी ‘सॅफरॉन’चा सूत्रधार शशिकांत राणे याच्या जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर असलेल्या मोठमोठ्या मालमत्तांचा तपशील प्राप्त केला आहे. सिंधुदुर्ग वैभववाडीमधील लोरे या गावी राणे याने मोठी जमीन खरेदी केली. गोळप येथे जागेसह बंगला, जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मालमत्ता आहे.
पोलिसांनी शोधल्या राणेच्या मालमत्ता
By admin | Published: July 23, 2014 12:49 AM