रत्नागिरी - आपल्याला कोरोना झाला असल्याचा संशय रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने व्यक्त केला आहे. मात्र आपल्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठवले जात नसल्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान त्या रुग्णालयात दाखलच होत नसल्याचा दावा आरोग्य यंत्रणेने केला असून, आता त्यांना पोलिसांकरवी ताब्यात घेण्यात येणार आहे.
दुबई येथून आलेला शृंगारतळी येथील प्रौढ कोरोना पाँझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाला. त्या रुग्णाचे नमुने आपण घेतले होते. त्यामुळे आपणही संशयित असल्याचा दावा सदर महिला डॉक्टरने केला आहे. आपल्या थुंकीचे नमुने तपासणी करुन घ्यावेत अशी विनंती आपण केली होती. मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांनी ते पुढे न पाठवले नाहीत अशी तक्रार या डॉक्टर महिलेने जिल्हाधिकारी यांच्याकडे गुरुवारी रात्री केली.
सदर महिला डॉक्टरला रुग्णालयात दाखल होण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र त्याला त्यांची तयारी नसल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. शुक्रवारी सकाळी या विषयाला वाचा फुटल्यानंतर त्या महिला डॉक्टरला पोलिसांकरवी ताब्यात घेण्यात येणार आहे.