खेड : खेड ते लोटे या प्रवासादरम्यान हरवलेला मोबाईल चक्क झारखंडपर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले आणि पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा मोबाईल परत मिळवण्यात यश आले. हा मोबाईल मालकापर्यंत पोहोचवण्यातही आला.
शहरातील भैरीभवानी नगर येथील ॲड. सिद्धी खेडेकर या खेड ते लोटे असा प्रवास करत असताना त्यांच्याकडील १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल गहाळ झाला होता. याबाबत त्यांनी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या तपासात हरवलेला मोबाईल झारखंड राज्यातील हजारीबाग येथे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकिरण काशीद, पोलीस निरीक्षक निशा जाधव व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी तपासाला गती दिली.
गहाळ झालेला मोबाईल वापरत असलेल्या हजारीबाग येथील व्यक्तीशी संपर्क साधून त्याला पोलिसांनी विश्वासात घेऊन हा मोबाईल कुरियरद्वारे येथील पोलीस स्थानकात मागविण्यात आला. मोबाईल मिळताच तो ॲड. सिद्धी खेडेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.