विनोद पवारराजापूर : राजापूर शहरात एका चार वर्षीय बालकामध्ये पोलिओ सदृश्य (जी. बी. सिंड्रोमची) लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या बालकावर सध्या कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात उपचार सुरू आहेत.खबरदारी म्हणून पोलिओ सदृश्य लक्षणे आढळलेल्या बालकाच्या घरापासून शहर व परिसरातील पाच किलोमीटर अंतरावरील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार असल्याची माहिती राजापूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राम मेस्त्री यांनी दिली आहे. याबाबत तातडीने सर्वेक्षण हाती घेण्यात आल्याचेही डॉ. मेस्त्री यांनी सांगितले.राजापूर शहरातील तालीमखाना भागातील हा बालक असून तो शहर बाजारपेठेतील एका अंगणवाडीमध्ये शिकत आहे. ८ आॅगस्ट पासून त्याला ताप आला होता. पालकांनी त्याला शहरातील खासगी डॉक्टरांकडे दाखवले. मात्र, यानंतर बालकाचे हात व पाय दुखण्यास सुरूवात झाली. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला कोल्हापूर अथवा मुंबईला हलविण्याचा सल्ला दिला. पालकांनी त्याला कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात दाखल केले आहे.पोलिओ सदृश्य आजारात अंग दुखू लागणे, चालताना तोल जाणे, चेहरा सुजणे, चावताना व गिळताना त्रास होणे व हातपाय लुळे पडणे अशा प्रकारची लक्षणे आढळून येतात. अशीच काहीसी लक्षणे या बालकामध्ये आढळून आली आहेत.
राजापुरात चार वर्षीय बालकामध्ये आढळली पोलिओ सदृश्य लक्षणे, शहरात उडाली एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 6:16 PM