रत्नागिरी : नाचणे उपसरपंच निवडणुकीत गेल्या काही महिन्यात जे काही राजकारण पुढे आले आहे, त्यातून शिवसेनेचे राजकीय ‘नाच’णेच समोर आले आहे. गटातटाच्या या राजकारणात सेनेचा जुना निष्ठावंत गट व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सेनेत आलेल्या आमदार उदय सामंत गटातील भांडणातून बंडखोरी उफाळून आली आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व जुने निष्ठावंत एका बाजुला, तर आमदार उदय सामंत व त्यांचे समर्थक शिवसैनिक दुसऱ्या बाजुला असे वर्गीकरण झाले आहे. फणसोपमध्येही हेच घडले होते. सेनेची सदस्यसंख्या मोठी असतानाही तेथे अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्याची निवड करण्यात आली होती. नाचणे उपसरपंच निवडीबाबत पुन्हा पूर्वीप्रमाणेच स्थिती निर्माण झाल्याने जुन्या शिवसैनिकांनी पक्षात नव्याने दाखल झालेल्यांना अजूनही स्वीकारलेले नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सेनेतील हे राजकीय ‘नाच’णे आणखी किती काळ सुरू राहणार, असा सवाल निर्माण झाला आहे. नाचणे ग्रामपंचायतीत गेल्या निवडणुकीत सर्व १७ जागांवर सेनेचे सदस्य निवडून आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयसिंग घोसाळे यांच्या पत्नी जयाली घोसाळे यांना सरपंचपद देण्यात आले. परंतु उपसरपंचपदावरून त्यावेळीही मोठे राजकारण झाले. हे पद आमदार सामंत गटाचे भय्या भोंगले यांना देण्याचा निर्णय झाला. वरिष्ठांनी तसे आदेश दिले. परंतु नाचणे ग्रामपंचायतीचे राजकीय निर्णय हे तेथील शिवसेनेच्या शाखेतच ठरतात, हे त्यावेळीही जुन्या शिवसैनिकांनी दाखवून दिले. त्यानुसार अधिकृत उमेदवार भय्या भोंगले असतानाही बंडखोर कपिल सुपल यांची पुन्हा सेनेच्याच सदस्यांनी निवड केली व अधिकृत उमेदवार असूनही भोंगले यांचा पराभव झाला. तेव्हापासून या विषयावरून सेनेच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार राजकारण सुरू होते. त्यानंतरच्या काळात उपसरपंच सुपल यांचा पदाचा राजीनामा सेनेच्या नेत्यांनी तीन महिन्यांपूर्वीच घेतला. त्यामुळेच पुन्हा या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. भोंगले यांना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी उमेदवार म्हणून उभे राहण्याचे आदेश दिले. त्यामुळे भोंगले हेच उपसरपंच होणार हे नक्की समजले जात होते. परंतु प्रत्यक्षात राजीनामा घेतलेल्या सुपल यांनी उपसरपंचपदासाठी पुन्हा उमेदवारी अर्ज भरला. या विषयावरील निर्णयासाठी जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुखांनी बोलावलेल्या बैठकीतही एका गटाने नाचणे शाखा ठरविल तोच उपसरपंच होणार, असे ठणकावून सांगितले व नंतर सुपल यांनाच पाठिंबा देण्याची घोषणा केली. त्यानुसार सुपल हे विजयी होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने भोंगले यांनी अर्जच दाखल केला नाही. परिणामी सुपल हे उपसरपंचपदावर बिनविरोध निवडून आले. परिणामी भोंगले यांच्यासह एकत्र असलेल्या पाच सदस्यांनी आपण आपली वेगळी भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. हे पाच सदस्य नेमकी काय भूमिका घेणार, पक्षातच राहून लढणार की, सेनेला जय महाराष्ट्र करणार, याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. (प्रतिनिधी)सदस्यांना थोपवणार कसे? : नेत्यांची राजकीय कोंडीरत्नागिरीनजीकच्या नाचणेत शिवसेनेअंतर्गत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे कथित दोन गटांच्या नेत्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. जिल्हाप्रमुखांचा आदेशही मानला न गेल्याने सेनेतील दरारा संपला काय, अन्य पक्षांप्रमाणेच सेना हा पक्ष कार्यरत झाला आहे काय, यांसारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व प्रकरणात सेनेच्या वरिष्ठ नेत्यांची कोंडी झाली असून, नाराज गटाच्या सदस्यांना थोपवायचे कसे, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेनेतील हे वादळ आता चव्हाट्यावर आले आहे.गटबाजी उघड...गटातटाचे राजकारण आणि शिवसेना हे गेल्या काही महिन्यातील समीकरण झाले आहे. यापूर्वीही शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळून आली होती. नाचणे उपसरपंच निवडणुकीमुळे ती पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
सेनेत राजकीय ‘नाच’णेच...
By admin | Published: June 14, 2016 9:23 PM