रत्नागिरी : गेल्या काही दिवसात एका काेविड केअर सेंटरच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर उमटत आहेत. वादग्रस्त ठरलेल्या या रुग्णालयाला मान्यता देण्यासाठी नाचणे परिसरातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनीच पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रही दिले हाेते. राजकीय हस्तक्षेपामुळेच हे रुग्णालय सुरू करण्यात आले असून, अनुभवी डाॅक्टरांशिवाय या रुग्णालयाला मान्यता कशी देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काेराेना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने अनेकांच्या पाेटात भीतीचा गाेळा येत आहे. त्यामुळे अनेकजण जीव वाचविण्यासाठी रुग्णालयांचा आधार घेत आहेत. सध्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शासकीय रुग्णालयातील बेडही कमी पडत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांना काेविड सेंटरची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ही परवानगी मिळाल्यानंतर अनेकांनी त्याआधारे डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी नाचणे परिसरात एक हाॅटेलरूपी रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. मात्र, याठिकाणी रुग्णांना आपला जीव गमवावा लागत असल्याने नातेवाईकांनी रुग्णालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. त्यानंतर या रुग्णालयातील कारभार चव्हाट्यावर आला.
नाचणे परिसरात काेविड सेंटर सुरू हाेण्यासाठी या भागातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याची बाब समाेर आली आहे. त्यासाठी त्यांनी साेशल मीडियाच्या माध्यमातून लाेकांना एकत्र येण्याचे आवाहन केले हाेते. एका ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्रही दिले. हे रुग्णालय सुरुवातीच्या काळात शांतिनगर परिसरात उभारण्याच्या हालचाली सुरू हाेत्या. त्यानंतर त्याची जागा बदलून महामार्गालगत सुरू करण्यात आले. याठिकाणी काम करत असलेल्या ॲलाेपॅथिक डाॅक्टरचे नावही याच पदाधिकाऱ्यांनी सुचविले हाेते.
हे रुग्णालय सुरू हाेण्यासाठी धडपडणारे लाेकप्रतिनिधी तेथील गलथान कारभाराबाबत आता गप्प का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घाईघाईत हे रुग्णालय सुरू करण्यामागचे कारण काय, असाही प्रश्न उपस्थित हाेत आहे. ज्या रुग्णालयात आयुर्वेदिक आणि ॲलाेपॅथिकचे डाॅक्टर काेराेनावर उपचार करणार असतील, त्या रुग्णालयाला काेणत्या निकषावर परवानगी देण्यात आली, असाही प्रश्न उपस्थित हाेत आहे. या संपूर्ण कारभाराची चाैकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.