चिपळूण : कोण नगरसेवक काय आहे, हे शहरातील जनतेला चांगले माहीत आहे. शहरातील विकास कामांमध्ये कोणी पैसे खाल्ले असतील, कोणाचे ठेकेदारांशी संधान असेल, त्यांना चिपळूणचे ग्रामदैवत भैरीबुवा आणि लोटनशाह पीर बाबा बघून घेईल, असे उदगार महाविकास आघाडीचे नगरसेवक बिलाल पालकर यांनी काढताच आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी जोरदार समर्थन केले. याचवेळी नगरसेवक विजय चितळे यांनी पलटवार करताच दोन्ही गटात जोरदार खडाजंगी झाली.नगर परिषदेच्या श्रावणशेठ दळी सभागृहात वाणी आळीतील रस्ता व नारायण तलावाचे रखडलेले काम याबाबत मंगळवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत तांत्रिकदृष्ट्या वर्षभर शहरातील वाणीआळीतील रस्ता रखडला आहे.
आता शिमगोत्सवापूर्वी या रस्त्याचे काम मार्गी लागावे, यासाठी स्थानिक नगरसेवक व पाणी सभापती बिलाल पालकर व नगरसेविका शिवानी पवार सातत्याने याबाबत सभागृहात आवाज उठवित होते. तसेच विशेष सभेची मागणी केली होती. त्यानुसार नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.विशेष सभा घेण्याचा प्रत्येक सदस्याला दिलेला आहे. त्या अधिकाराचा वापर करा आणि कामे करून घ्या असे आवाहन यावेळी नगराध्यक्षा खेराडे यांनी केले. तसेच अर्थसंकल्प मंजूर न झाल्याने वर्षभर कामे राखडली, असेही स्पष्ट केले. यावेळी नगरसेविका सीमा रानडे यांनी एक नव्हे तीन वर्षात कामे का झाली नाहीत, असा प्रश्न केला.यावर नगरसेवक विजय चितळे यांनी केलेल्या वक्तव्यावरून सभागृहात जोरदार गदारोळ माजला. यावेळी नगरसेवक बिलाल पालकर यांनी कोण कसा आहे आणि कोणाचे कोणाशी संधान आहे हे जनतेला माहीत आहे. अगदीच वेळ आली तर चिपळूणचे ग्रामदैवत भैरी बुवा आणि लोटन शाह बघून घेईल. आम्ही आमच्या कामांसाठी भांडत आहोत. ही कामे मार्गी लागली पाहिजेत. ती होत नसल्याने आपल्याला जनतेला तोंड द्यावे लागत असल्याची नाराजी व्यक्त केली. यावर नगरसेवक शशिकांत मोदी यांनी प्रशासनानेच यातून सुवर्णमध्य काढावा अशी मागणी केली. यानंतर उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.चितळे यांचा आरोपमहाविकास आघाडी एकीकडे कामांना विरोध करते, वाढीव दराविषयी ओरड करते आणि त्याच कामांवर सुरवायझर म्हणून देखरेख करताना फोटोसेशन केले जाते. तेव्हा भ्रष्टाचार दिसत नाही का, असा प्रश्न केला. तसेच काहींचे ठेकेदारांशी संधान असल्याचा आरोप विजय चितळे यांनी केला.