प्रशांत सुर्वे
मंडणगड : काेराेनाच्या काळात राजकारण विरहीत समाजकारण करण्याबाबत सुताेवाच करतानाच तालुक्याला मिळालेल्या रुग्णवाहिकेवरून मात्र श्रेयवाद रंगू लागला आहे. महामारीच्या या दिवसात लाेकांच्या हिताकडे पाहण्यापेक्षा लाेकप्रतिनिधी रुग्णवाहिका दिल्याचे श्रेय लाटण्यात रंगले आहेत. विकासकामांची वाटणी करणारे आता मात्र, श्रेयवादासाठी भांडत असल्याने चक्क दाेन - दाेनवेळा उद्घाटनाचे घाट घातले जात आहेत.
सर्वपक्षीयांनी या आधीच विकासकामांची वाटणी करत आपली तोंडे बंद केली आहेत. आता राजकारण करण्यासाठी मुद्दा शोधताना ‘राजकारण विरहीत समाजकारण करूया आणि कोरोनाला वेशीबाहेर थोपवूया’ या म्हणीचा राजकारण्यांनाच विसर पडला आहे. कधी नव्हे तेवढी वैद्यकीय सुविधा आरोग्य विभागाला कोरोना कालावधीत मिळाली आहे. तालुक्यात नुकत्याच दोन रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. या रुग्णवाहिका कोणाच्या प्रयत्नाने आल्या, त्यासाठी कोणी प्रयत्न केले. यावरून तसेच या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा कुणी करावा यावरून तालुक्यात मित्रपक्ष (विरोधीपक्ष) व पक्षांतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे.
तालुक्यात आलेल्या कुंबळे व देव्हारे या दोन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा दोनवेळा पार पडला. देव्हारे येथे प्रथम शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य व नंतर विद्यमान आमदार यांच्या हस्ते तसेच कुंबळे येथील लोकार्पण सोहळा प्रथम मित्र पक्षाचे पंचायत समिती सदस्य व नंतर विद्यमान आमदार यांच्या हस्ते पार पडला.
या सर्व प्रकारात सर्वसामान्य नागरिक मात्र कुठेच दिसला नाही. दोन्ही आरोग्य केंद्रांतील दोन्ही रुग्णवाहिका सुमारे पंधरा वर्षापूर्वीच्या आहेत. त्याही कित्येक वर्षे नादुरुस्त आणि जनसेवेपासून दूर राहिल्या आहेत. अशावेळी तालुक्यातील एकाही राजकारण्यास त्या दुरूस्त करून घ्याव्यात किंवा त्यासाठी प्रयत्न व्हावेत असे वाटले नाही. तालुक्यातील आरोग्य सुविधा आजही न बोलण्यासारखाच विषय बनला आहे. जसे रस्ते, वीज, पाणी या मानवाच्या मूलभूत सुविधा आहेत. तसेच आरोग्य ही महत्त्वाची सुविधा आहे, याचा तालुकावासीयांना विसर पडला आहे. तालुक्याच्या निर्मितीआधीपासून तालुक्यातील आरोग्य सुविधा नव्हती आणि आजही ती नसल्यातच जमा आहे. जिल्हा कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरत असताना मंडणगड तालुक्यातही रुग्णसंख्या गतवर्षीपेक्षा दुप्पट, तिपट्ट झाली आहे. तरीही येथे व्हेंटीलेटर नाही, अन्य तालुक्यात रुग्ण संख्या वाढू लागली आहे. तेथे व्यवस्था होत नाही म्हणून नियमांना बगल देत तालुक्यात काेरोना उपचार केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, मंडणगडमध्ये या साेयीसुविधांकडे लक्ष देण्यापेक्षा श्रेयवादातच राजकारणी रमल्याने जनतेकडून आश्चर्य व्यक्त हाेत आहे.