राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. आताच्या काळात तर राजकारणात फार मोठे बदल दिसतात. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे आताच्या राजकारणात उलथापालथींना अधिकच वेग आला आहे. त्यातून दोन मोठी पक्षांतरे पाहण्याची संधी रत्नागिरी जिल्हावासीयांना मिळणार आहे. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत असल्याने साहजिकच दोन बडे नेते भाजपच्या वाटेवर आहेत. या दोन्ही पक्षांतरांची अधिकृत माहिती अजून कुठल्याही स्तरावर जाहीर झालेली नाही. पण, त्याची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि मुख्य म्हणजे तो विषय नाकारलाही जात नाहीये.सध्याचे राजकारण व्यक्तिकेंद्री आणि सत्ताकेंद्री असे झाले आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती एखाद्या पक्षात वर्षानुवर्षे विविध पदे भुषवून सत्तेत असलेल्या दुसऱ्या पक्षाकडे जाते आणि मागून अनेक समर्थक तिकडे प्रवेश करतात. पक्षांतराची साथ तशी कायमच पसरलेली असते. पण, निवडणुका जवळ आल्या की, तिची लागण जरा अधिकच बळावते. आताही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि अशी पक्षांतराची साथ मोठ्या प्रमाणात पसरू लागली आहे.ग्राम किंवा तालुका पातळीवरील पक्षांतरे ही बहुतांशवेळा उमेदवारी मिळण्या न मिळण्यावरून होतात. वर्षानुवर्षे पक्षाचे काम करूनही उमेदवारी मात्र नेत्यांच्या जवळच्या माणसाला किंवा आयात कार्यकर्त्याला मिळाली की, पक्षांतराचा वेग वाढतो.सध्या मात्र दोन पक्षांतराची चर्चा जिल्हाभर सुरू आहे. ही पक्षांतरे स्थानिक स्वराज्य संस्थेसारख्या छोट्या गोष्टींसाठी नाहीत. ती राज्यस्तरावर लक्ष वेधून घेणारी पक्षांतरे ठरणार आहेत. अजून त्याबाबतची कोणतीही अधिकृत बाजू समोर आलेली नसली तरी ते तेवढ्या तीव्रतेने नाकारलेही जात नाहीये.पहिली चर्चा आहे ती दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची. शिवसेनेकडून पाच वेळा आमदार राहिलेले दळवी २0१४च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले ते अंतर्गत बंडाळीमुळे. त्यांच्याच जवळच्या काही लोकांनी विरोधात काम केल्याचा त्यांचा आक्षेप किंबहुना आरोप आहे. या पक्षविरोधी कारवायांमुळेच आपला पराभव झाल्याचे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. शिवसेनेत त्यांची घुसमट होत आहे, हेही अनेक गोष्टींमधून पुढे येत आहे. त्यांना आशा होती ती पुढील विधानसभेची. मात्र, आता पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम दापोली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पुढे येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे दळवी यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ते नाराज आहेत. शेवटपर्यंत आपण शिवसेनेतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण दळवी यांनी दिले असले तरी त्यांची नाराजी अनेक प्रसंगांमधून पुढे आली आहे.दुसरे पक्षांतर चिपळूणमध्ये अपेक्षित आहे. राष्ट्रवादीचा एक प्रसिद्ध नेता भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आता हळूहळू पुढे येत आहे. पक्षांतर्गत कुरबुरी आणि कलहांमुळे त्रस्त झालेला हा नेता केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपर्यंत वाट पाहील आणि त्यानंतर ते आपला मार्ग ठरवतील, असे सध्या दिसत आहे. ज्या नेत्याबाबत चर्चा सुरू आहे, त्याची चिपळूणच्या राजकारणात चांगली वट आहे. चिपळूणच्या राजकारणावर विशेषत: शहरी राजकारणावर विशेष पकड आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याचा फार मोठा फरक राष्ट्रवादीला पडू शकेल. भाजपच्या प्रदेशस्तरावर सध्या त्याबाबतची बोलणी सुरू आहेत. लवकरच त्याला मूर्तस्वरूप येईल, अशी माहिती भाजपच्याच एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने दिली आहे.सध्या केंद्र आणि राज्यात भाजप सत्तेत असल्याने भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मात्र आऊटगोर्इंगच सुरू आहे. सध्या शिवसेनेकडे जागा कमी आणि उमेदवार जास्त असल्यामुळे शिवसेनेत आऊटगोर्इंग आणि इनकमिंग दोन्ही सुरू आहे. सध्या निवडणुकीचा ज्वर वाढू लागल्याने स्थानिक पातळीवर अजून बरेच बदल होणार, हे नक्की आहे.मनोज मुळ््ये.
राजकारणाच्या पटलावर उलथापालथींना वेग -
By admin | Published: October 07, 2016 10:38 PM