रत्नागिरी : बदलापूर येथे बालिकेबाबत घडलेला प्रकार अत्यंत वाईट आहे. यातील आरोपीला फाशीची शिक्षाच व्हायला हवी, अशी कलमे लावण्याची सूचना केली असून तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोपीला अटक झाली आहे तसेच सरकार आवश्यक ती पावले उचलत आहे. मात्र तरीही या प्रकरणात केले जाणारे राजकारण हे विकृत मानसिकतेचे लक्षण आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना फटकारले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रत्नागिरीतील कार्यक्रमात ते बोलत होते. बदलापूर येथे झालेली घटना अत्यंत दु:खद आहे. यात संबंधित संस्थाचालकांचीही चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यात आले आहेत. अशा राजकारणातून त्या चिमुरडीचे आयुष्य बरबाद करू नये, असेही ते म्हणाले.
लाडकी बहीण योजनेचे पोस्टर आणलेहे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. सरकार म्हणून आम्ही आवश्यक ती सर्व पावले उचलत आहोत. मात्र दुर्दैवाने काहीजणांना यात फक्त राजकारण करायचे आहे. बसभरून आंदोलक आणले जात होते. एक गेले की दुसरे येत होते. जिथे आंदोलन केले जात होते, तेथे लाडकी बहीण योजनेचे पोस्टर आणले गेले. हे कसले राजकारण आहे, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.