असगोली : गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या तवंगाची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अजय चव्हाण आणि कर्मचारी संकेत कदम गुहागरमध्ये दाखल झाले हाेते. त्यांनी समुद्रातील तवंगमिश्रित पाण्याचे नमुने घेतले आहेत. हा तवंग कसला आहे हे अहवाल आल्यानंतरच कळणार आहे.
समुद्र खवळू लागल्याने तवंग सतत जागा बदलत आहे. त्यामुळे पूर्वीइतकी तीव्रता दिसून येत नाही. तसेच लाटा उंच उसळत असल्याने आणि पाण्याचा वेग वाढल्याने थेट तवंगापर्यंत पोहाेचून त्याचे नमुने घेण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाला अपयश आले. तवंगमिश्रित पाणी अजय चव्हाण यांनी सहज तपासून पाहिले. तेव्हा या पाण्याला चिकटपणा नव्हता. वेगळा वासही येत नव्हता. नमुना म्हणून कॅनमध्ये भरलेले पाणी हिरवट रंगाचे दिसत होते. त्यामुळे हा तवंग तेलाचा नसावा. समुद्रातील हालचालींमुळे तळाशी असलेली घाण किंवा समुद्रातील घाण एकत्रितपणे समुद्रातून बाहेर पडत असावी, असा प्राथमिक अंदाज अजय चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात यामध्ये कोणते घटक आहेत याचे अधिकृत उत्तर प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच देता येईल, असेही त्यांनी सांगितले. तपासणीसाठी नमुना घेण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळातील कर्मचारी संकेत कदम यांनी केले. यावेळी गुहागर नगरपंचायतीचे कर्मचारी ओंकार लोखंडेही उपस्थित होते.
------
आमचे कार्यक्षेत्र औद्योगिक क्षेत्रापुरते
आमचे कार्यक्षेत्र औद्योगिक क्षेत्रापुरते मर्यादित आहे. समुद्रकिनाऱ्यावरील प्रदूषणाची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे, असे सांगण्यात आले. गुहागर नगरपंचायतीच्या प्रतिनिधीलाही यावेळी त्यांनी बोलावून घेतले होते. जर औद्योगिक क्षेत्रापुरते प्रदूषण मंडळ असेल, तर रत्नागिरी, रायगडमधील पर्यटन व्यावसायिकांना सांडपाण्यावरून प्रदूषण मंडळाने नोटीस का पाठविल्या, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.