शोभना कांबळेरत्नागिरी : कोरोनामुळे शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतनच्या विविध शाखांमधील प्रवेश यावर्षी उशिरा झाले. अनेक अडचणींचा सामना करून ऑनलाईन वर्ग सुरू होते. तशातच आता परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, १५ फेब्रुवारीपासून या मुलांच्या प्रात्यक्षिक परीक्षाही सुरू होत आहेत. त्यामुळे या मुलांसाठी तसेच प्राध्यापक वर्गासाठी ही कसोटी ठरणार आहे.जिल्ह्यात रत्नागिरीतील शासकीय तंत्रनिकेतनसह एकूण आठ पॉलिटेक्निक कार्यरत आहेत. विविध अभ्यासक्रमांमध्ये सुमारे २,१०० विद्यार्थी शिकत आहेत. यावर्षी कोरोनामुळे पॉलिटेक्निक बंद राहिली असली, तरी जुलै महिन्यापासून ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यात अनेक अडचणी येत होत्या. मात्र, शिक्षकांनी मेहनत घेऊन ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. अजूनही कॉलेजमध्ये येणे विद्यार्थ्यांना सक्तीचे नाही. परंतु, आता अचानक परीक्षांचे वेळापत्रक बोर्डाने जाहीर केले आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाच्या मान्यतेने कॉलेज सुरू करण्याच्या सूचनाही आहेत. वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थी तणावाखाली आहेत.धावपळ होणार...कोरोनाच्या कालावधीत काही पॉलिटेक्निकची वसतिगृहे क्वॉरंटाईनसाठी प्रशासनाने ताब्यात घेतली होती. ती आता ताब्यात दिली असली, तरी बंद असल्याने निर्जंतुकीकरण, वीज आदी सुविधाही पाहाव्या लागणार आहेत.
प्रत्यक्ष कॉलेजमध्ये येऊन शिकणे आणि ऑनलाईन शिक्षण यात फरक पडतो. विशेषत: ग्रामीण भागातील मुलांना तर ऑनलाईन शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तिथे ऑनलाईनसाठी कनेक्टिव्हिटीची समस्या येते. आमचा ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. परंतु, परीक्षा जाहीर झाल्याने त्याचे दडपण येणे स्वाभाविक आहे.- सफवान नाकाडे, विद्यार्थी
आमच्या सरांनी आमचा अभ्यासक्रम ऑनलाईन पूर्ण करून घेतला आहे. अजूनही कॉलेज सुरू नसल्याने आमची परीक्षाही ऑनलाईन होणार, असे म्हटले जात आहे. आमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला असला तरी पहिल्यांदाच आम्ही ऑनलाईन परीक्षा यावर्षी देत आहोत. अभ्यासक्रम पूर्ण झाला असल्याने या परीक्षेची भीती तशी वाटत नाही.- इरम पठाण, विद्यार्थिनी
वेळापत्रकानुसार १५ पासून प्रात्यक्षिक परीक्षा आहेत. स्थानिक प्रशासनाची मान्यता घेऊन या परीक्षा घ्याव्यात, अशा सूचना तंत्रशिक्षण मंडळाच्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे. त्यांच्या आदेशानुसार परीक्षांबाबत निर्णय घेतला जाईल.- औदुंबर जाधव,प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी