लांजा : तालुक्यातील हर्दखळे येथील स्मशानभूमीची दुरवस्थेबाबत प्रशासनाला गेली वर्षभर निवेदने देऊनही प्रशासन याकडे कानाडोळा करीत असल्याने मनसेचे लांजा तालुका संपर्कप्रमुख चंद्रकांत गुरव यांनी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
हर्दखळे येथील स्मशानभूमीच्या दुरवस्थेमुळे पावसाळ्यात मृतदेह जाळण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाला निवेदने देऊनही स्थानिक प्रशासन लक्ष देत नसल्याने मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यावेळी माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून हर्दखळे स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी रत्नागिरी केली होती. परंतु त्या पत्रालाही प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे. स्मशानभूमीचे काम पावसाळ्यानंतर न झाल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा हर्दखळेचे सुपुत्र लांजा तालुका संपर्कप्रमुख चंद्रकांत गुरव यांनी दिला आहे.