रत्नागिरी : रत्नागिरी शहरात अनेक उद्याने आहेत. कोरोना काळात ही उद्याने बंदच आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडी वाढली आहे. उद्यानातील खेळण्यांना गंज आला असून, अनेक खेळणी मोडली आहेत. काही उद्यानांना कंपाउंड नसल्याने उद्यानांची दुरवस्था झाली आहे.
मार्ग निवाऱ्याची दुरवस्था
टेंभ्ये : रत्नागिरी ते काजरघाटीमार्गे पोमेंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तीव्र उतार संपल्यानंतर असलेल्या मार्ग निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. दीड वर्षापूर्वी या निवाऱ्यावर डंपर जाऊन आदळला होता. त्यामुळे हा निवारा पूर्णपणे कोसळून गेला होता. या निवाऱ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
छात्रसेनेमार्फत स्वच्छता
दापोली : येथील न.का. वराडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्रसेना विभागातील विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवेतून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याभोवतालचा परिसर स्वच्छ केला. हा उपक्रम प्राचार्य डाॅ. सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
गटविकास अधिकारीपदी पाटील
खेड : येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण जाधव सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या रिक्त पदावर शहापूर (जि. ठाणे) येथील सहायक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सुशांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
रत्नागिरीत लसीकरण
रत्नागिरी : पंचायत समिती आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ऑगस्ट रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उदयमनगर, पटवर्धन प्रशाला आणि मिस्त्री हायस्कूल येथे कोवॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत या या केंद्रावर प्रत्येकी ५० डोसचे नियोजन करण्यात आले आहे.