लाेकमत न्यूज नेटवर्क्
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कोकण रेल्वेच्या संगमेश्वर स्थानकात प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना उभे राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या सर्वच प्रवासी निवाराशेडवरील कौले उडून त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना भरपावसात उभे राहावे लागत आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाला पत्र देणार असल्याचे सांगितले. त्यानंतरही दुरुस्ती न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
कोकण रेल्वेच्या संगमेश्वर रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या सर्वच प्रवासी निवाराशेडची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी हे शेडमध्ये येऊन चिखल झाला आहे. प्रवाशांना पावसातच उभे राहून रेल्वेची प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच आजूबाजूला प्लॅटफॉर्मवरही गवताचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे बाहेर उभे राहतानाही सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. पाऊस नसताना शेडमध्ये उभे राहावे तर वरून कौल डोक्यात पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काही प्रवाशांनी ही बाब मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या निदर्शनाला आणून दिली असता, त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. याबाबत आपण शुक्रवारी कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. संगमेश्वरसह सर्वच स्थानकांवरील अशा समस्या कोकण रेल्वे प्रशासनाने सोडवाव्यात व प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जितेंद्र चव्हाण यांनी केली आहे.
---------------------------
काेकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रेल्वे स्थानकावर असलेल्या प्रवासी शेडवरील काैले उडाल्याने प्रवाशांना पावसातच उभे राहावे लागत आहे. (छाया : मिलिंद चव्हाण)