रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर-डिंगणी रस्त्याचे नुकतेच मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, येथील सीएनजी पंपाच्या अवघड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली असून, साइडपट्ट्याही धोकादायक झाल्याने वाहतुकीला प्रचंड हाल होत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याबाबतची तक्रार ग्रामपंचायत आणि सीएनजीच्या व्यवस्थापनाकडे ग्रामस्थांनी केली आहे.
संगमेश्वर शास्त्रीपूल येथून थेट डिंगणी-फुणगूस ते गणपतीपुळे हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. गणपतीपुळे येथे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने येथे नेहमीच रहदारी असते. खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करून निविदाप्रक्रिया राबवण्यात आली होती. वर्षभरापूर्वी कामाला सुद्धा सुरुवात झाली होती. परंतु, कोरोनाच्या पहिल्या हे काम रखडले होते. मात्र, ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी आंदोलनात्मक भूमिका घेतल्याने कामाला चालना मिळाली. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात या नादुरुस्त रस्त्याचे मजबुतीकरण, खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. त्याचवेळी साइडपट्ट्यांचे सुद्धा काम करण्यात आले.
दरम्यान, पावसाळा सुरू होताच साइडपट्ट्यावरून अवघड वाहने उभी करून ठेवल्याने नवीन रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला. एकेरी मार्ग असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देण्यासाठी लहान वाहनांना साहजिकच साइडपट्टीवर जावे लागते. परंतु साइडपट्ट्याच उद्ध्वस्त झाल्याने रिक्षा, दुचाकी तसेच छोटी चारचाकी वाहने अडकून पडत आहेत. याच परिसरात रस्त्याला लागून सीएनजी पंप आहे. त्यांची अवघड वाहने सतत वाहतूक करत असतात व साइडपट्ट्यांवर तासनतास उभी असतात. त्यामुळे नवीन रस्त्याची दुरवस्था झाली असल्याचा थेट आरोप ग्रामस्थ व वाहन चालकांनी केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी डिंगणी ग्रामपंचायतींकडेही तक्रार केली आहे. या रस्त्याची वेळीच दुरुस्ती न झाल्यास अपघाताची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.