रत्नागिरी : इंदिरा आवास योजना आणि रमाई आवास योजनांतर्गत तालुक्यातील गरीब, गरजू कुटुंबियांसाठी १०९ घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे.अनुसूचित जातीच्या व्यक्तींना त्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे स्वत:च्या उत्पन्नातून चांगल्या प्रकारे पक्के घर बांधणे शक्य होत नाही. ग्रामीण भागामध्ये बहुतांशी अनुसूचित जातीचे लोक हे कच्च्या घरामध्ये राहतात. नोकरीसाठी ग्रामीण भागातील बहुतांश लोक शहराकडे आलेले आहेत. शहरातील वाढत्या किंमतीमुळे तेथे ते स्वत:चे घर घेऊ शकत नाही. पर्यायाने त्यांना झोपडपट्टीमध्ये राहावे लागते. ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्चा घरांच्या ठिकाणी पक्के घर बांधून या योजनेअंतर्गत देण्यात येतात. इंदिरा आवास घरकुल योजना केंद्र व राज्य शासन हे संयुक्तपणे राबविण्यात येत आहे. या योजनेंच्या माध्यमातून घरकुलांसाठी सुरुवातीला ६८ हजार रुपये लाभार्थ्यांना देण्यात येत होते. मात्र, आता एक लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील घरकुलांना ७० हजार रुपये अनुदान दिले जात होते. हे अनुदान घरकुल बांधण्यासाठी अपुरे पडत असल्याने शासनाने त्यामध्ये वाढ करुन आता ते एक लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे.इंदिरा आवास योजनेअंतर्गत तालुक्यासाठी ६६ घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यामध्ये हातखंबा, कापडगांव, चाफेरी, चिंद्रवली, मालगुंड, कळझोंडी, ओरी, नेवरे, सोमेश्वर, निवेंडी, धामणसे, हरचिरी, जयगड, तरवळ, चरवेली या गावातील लाभार्थींचा समावेश आहे. तर रमाई आवास योजनेंतर्गत २१ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. त्यामध्ये खालगांव, टिके, गुंबद, रानपाट, विल्ये, नाणिज, निरुळ, देऊड, कोळंबे व हातखंबा या गावातील लाभार्थ्यांना घरकुले देण्यात येणार आहेत. मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी या घरकुलांना नुकतीच मंजूरी देण्यात आली असून आता लवकरच त्या कुटुंबियांना त्याचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेमुळे गरीब कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले. (शहर वार्ताहर)
गरीब कुटुंबियांना १०९ घरकुले
By admin | Published: September 04, 2014 11:21 PM