आॅनलाईन लोकमतरत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाची निवडणुक दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाच शिवसेनेमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे़ आदेशा पुढे काही चालणार नसले तरी अरुण कदम, बाळकृष्ण जाधव, महेश नाटेकर, चंद्रकांत मणचेकर, चारुता कामतेकर आणि भारती सरवणकर हे सभापतीपदाच्या शर्यतीत आहेत़जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता सभापतीपदाच्या निवडीसाठी राजकीय वारे वाहू लागले आहेत़ शिवसेनेची जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता असल्याने निवड बिनविरोध होणार आहे़ त्यामुळे प्रत्येक इच्छुक उमेदवार सभापतीपद कसे आपल्या पारड्यात पडेल, यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारीला लागले आहेत़ त्यामुळे ही निवडणुक बिनविरोध होणार असली तरी शिवसेनेच्या धक्कातंत्राचा वापर यावेळीही होणार, हे निश्चित असल्याचे मानले जात आहे़ समाजकल्याण सभापती पदासाठी दापोतील जालगाव गटाच्या चारुता कामतेकर यांच्या नावाची चर्चा आहे़ कामतेकर या जिल्हा परिषदेच्या माजी सभापती आहेत़ शिक्षण व वित्त सभापतीपदासाठी गुहागर तालुक्याचे महेश नाटेकर यांच्या केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते पाठीशी असल्याने त्यांनाही संधी मिळू शकते़ तर महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी राजापूरच्या भारती सरवणकर यांची नांवे पुढे आहेत़ तसेच लांजाचे चंद्रकात मणचेकर हेही सभापतीपदाच्या शर्यतीत आहेत़ त्याचबरोबर राज्याचे पर्यावरणमंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांचे बंधू अरुण कदम आणि चिपळूणचे बाळकृष्ण जाधव यांच्यामध्ये बांधकाम व आरोग्य सभापतीपदासाठी रस्सीखेच सुरु आहे़ मात्र, कदम हे खेड पंचायत समितीचे माजी सभापती असून त्यांना संधी मिळण्याची जास्त शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे़ जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य, शिक्षण व वित्त, समाजकल्याण, महिला व बालकल्याण या समित्यांच्या सभापतीपदासाठी दि़ ३ निवडणुक होणार आहे़ या विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी निवड होणाऱ्या सदस्यांना सव्वा वर्षासाठी संधी मिळणार आहे़ त्यासाठी इच्छुकांनी आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे़ मात्र, यावेळी सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे़ (शहर वार्ताहर)
रत्नागिरीत सभापतीपदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी, सोमवारी निवडणुक
By admin | Published: April 01, 2017 6:28 PM