रत्नागिरी : टपाल मतपत्रिका मतमोजणीबाबतचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, निवडून येणाऱ्या उमेदवारामधील मतांचे अंतर हे प्राप्त झालेल्या टपाली मतांपेक्षा कमी असेल तर टपाली मतपत्रिका फेरमोजणी करणे बंधनकारक आहे. टपाली मतपत्रिका मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय इव्हीएम मशिनच्या शेवटच्या फेरीची मतमोजणी करता येणार नाही. त्यामुळे टपाली मतमोजणीला वेगळे महत्व आहे.
मतमोजणीमध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक यांची जबाबदारी समजावून सांगितली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, तहसीलदार वैशाली पाटील, नगरपालिका प्रशासनच्या शिल्पा नाईक आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी २३ मे रोजी एफसीआय गोदाम, मिरजोळे, एमआयडीसी येथे होणाऱ्या मतमोजणी ठिकाणीची पाहणी केली. मतमोजणी सुरक्षित आणि सुरळीत होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद माळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, एमआयडीसीचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रेळेकर आदी उपस्थित होते.