रत्नागिरी : तालुक्यातील तळेकांटे येथील सामाजिक कार्यकर्ते संजय भागुराम कांबळे यांचे दि. ५ जुलैरोजी पहाटे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देहदानाचा संकल्प त्यांच्या कुटुंबीयांनी पूर्ण करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी मरणोत्तर देहदानासाठी त्यांचे पार्थिव सावर्डे येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, डेरवण येथील भ.क.ल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाला दिले आहे.
गोरगरिबांच्या हाकेला नेहमी धावून जाणारे संजय कांबळे यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले आहे. गावच्या विकासात त्यांचे नेहमीच योगदान होते. तळेकांटे तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपद म्हणून त्यांचे मोलाचे कार्य होते. पांगरी येथे विविध सोसायटीचे चेअरमनपद त्यांनी भूषविले होते.
नेत्रदान आणि देहदान याबद्दल ते नेहमीच कळकळीने बोलत असत, मात्र नुसते बोलून काही होत नाही, तर त्यांनी ते आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. संजय कांबळे यांच्या या कृतीचा आदर्श इतरांनीही ठेवावा, ही त्यांची अपेक्षा त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती.