राजापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राजापूर शहर व तालुका कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहावा याकरिता शहरात भरणारा आठवडा बाजार तूर्त स्थगित करण्यात यावा, अशी मागणी राजापूर तालुका व्यापारी संघटनेच्यावतीने तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राजापूर तालुका व शहरातील व्यापारी, नागरिकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केल्यामुळे याआधी दोनवेळा राजापूर तालुका व शहर कोरोनामुक्त झाले आहे. हीच स्थिती राहण्यासाठी स्थानिक प्रशासनाने राजापुरात भरणाऱ्या आठवडा बाजारावर स्थगिती आणावी, अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे. आठवडा बाजारामध्ये परजिल्ह्यातील व्यापारी अत्यंत दाटीवाटीने व्यापार करतात. बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी असताना नियमांचे पालनही होत नाही. कोरोनाचा संसर्ग वाढल्यास लॉकडाऊन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्याची प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव संपत नाही, तोपर्यंत आठवडा बाजाराला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, उपाध्यक्ष राजेंद्र नवाळे, खजिनदार दीनानाथ कोळवणकर, व्यापारी विनोद पवार, अभय मेळेकर, उमेश कोळवणकर, चंदू भोगटे आदींनी दिले.