लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : सावकारीप्रकरणी येथील तिघांवर याआधीच गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्यांच्याकडून झालेल्या उलटसुलट व्यवहाराविषयीचा चौकशी अहवाल सहाय्यक निबंधक कार्यालयाने जिल्हा निबंधकाकडे १५ दिवसांपूर्वाच सादर केला आहे. या अहवालात महत्त्वाचे मुद्दे मांडले गेल्याने त्यानुसार निबंधक कार्यालयाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार होती. मात्र, अद्याप याबाबतची कार्यवाही थंडावली आहे. काही दिवसांपूर्वी अभिजित गुरव या तरुणाने सावकारीला कंटाळून आत्महत्या केल्याने येथील सावकारी प्रकरण उघडकीस आले.
याप्रकरणी शिवा खंडजोडे, चांगदेव खंडजोडे आणि पूजा मिरगल या तिघांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सहाय्यक निबंधक कार्यालयाने संबंधितांच्या दोन कार्यालयावर धाडी टाकल्या. त्यामध्ये लॅपटॉप, कोरे धनादेश व बाँण्ड, वाहन आरसी बुक, मालमत्तेची कागदपत्रे आढळून आली होती. त्यानुसार सहायक निबंधक कार्यालयाने चौकशी अहवाल तयार करून तो जिल्हा निबंधक कार्यालयाकडे सादर केला आहे. याप्रकरणी निबंधक कार्यालयाकडून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यासाठी अत्यावश्यक असलेले पुरावे हाती लागल्याचे येथील सहायक निबंधकाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार या प्रकरणी संबंधितांवर दुसरा गुन्हा दाखल होण्याची शक्यता होती. मात्र, आता चौकशी अहवाल पाठवून १५ दिवस उलटले तरी प्रत्यक्षात याविषयात कोणताही कार्यवाही होताना दिसत नाही.
------------------------
सावकारांचे वसुली कर्मचारी पुन्हा सक्रिय
तरुणाच्या आत्महत्या प्रकरणानंतर येथील सावकारांनी सावध पवित्रा घेत संपूर्ण व्यवहार थांबवले होते. याशिवाय जप्त केलेली वाहने तसेच अन्य कागदपत्रे कर्जदारांना परत केली. त्यानंतर जोपर्यंत वातावरण शांत होत नाही, तोपर्यंत वसुली व अन्य कामकाज बंद ठेवण्याचा पवित्रा सावकारांनी घेतला होता. मात्र, आता पुन्हा एकदा शहरात सावकारी यंत्रणा सक्रिय होऊ लागली आहे. त्यांचे वसुली कर्मचारी बाजारपेठेत फिरून वसुली करताना दिसू लागले आहेत.