दापोली : तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी २२ जून राेजीच दिले हाेते. या आदेशाविराेधात हाॅटेलमालक सदानंद कदम यांनी न्यायालयात धाव घेतली हाेती. याप्रकरणी खेड येथील सत्र न्यायालयाने उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे हॉटेलमालक सदानंद कदम यांना तूर्तास दिलासा मिळाला असून, भाजप नेते किरीट साेमय्या यांच्या याचिकेलाही शह बसला आहे.
दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्ट हे पालकमंत्री अनिल परब यांचे असल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला हाेता. त्यानंतर अनिल परब यांनीही किरीट सोमय्या यांना प्रतिआव्हान देत या आरोपाबाबत एका आठवड्याच्या आत माफी मागावी, अन्यथा आपण १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत दापोली उपविभागीय कार्यालयात याबाबत चौकशी केली असता उपविभागीय कार्यालयाने सदानंद कदम यांच्या नावाने २२ जून रोजी आदेश दिला होता. या आदेशामध्ये हे बांधकाम सीआरझेड क्षेत्रात असल्यामुळे व समुद्राच्या उच्चतम भरतीपासून ५०० मीटरच्या आत असल्याने या बांधकामावर आक्षेप घेतला होता. शिवाय हे बांधकाम महसूल अधिनियम १९६६ चे कलम ५२ व ५३ अन्वये एक महिन्याच्या आत पाडून टाकण्याचे आदेश दिले हाेते. एक महिन्याच्या आत बांधकाम पाडले नाही तर महसूल विभाग कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता बांधकाम पाडेल, असेही म्हटले हाेते.
यानंतर सदानंद कदम यांनी खेड येथील सत्र न्यायालयात या आदेशाच्या विरोधात धाव घेतली. न्यायालयाने पुढील निर्णय होईपर्यंत स्थगिती आदेश दिलेला आहे. याप्रकरणी न्यायालयांमध्ये दोन तारखांची सुनावणी झाली असून, आता २८ ऑक्टोबर ही पुढील तारीख देण्यात आली आहे.
-------------------------
जागेची विक्री
जागेची २०१९ मध्येच विक्री ही जागा विभास साठे यांच्या नावाने होती. ती त्यांनी २०१९ ला अनिल परब यांना विक्री केली. अनिल परब यांनी त्याचवर्षी ही जागा सदानंद कदम यांना विक्री केल्याचे उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ही नोटीस सदानंद कदम यांच्या नावाने काढण्यात आल्याचे उपविभागीय कार्यालयाने स्पष्ट केले. बिनशेतीचा आदेश साठे यांच्या नावाने व बांधकामाची परवानगी कदम यांच्या नावाने असल्याचे स्पष्ट केले.