रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शिक्षक आणि ग्रामसेवकांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शिक्षक आणि ग्रामसेवकांच्या बदल्या करण्याचे आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेने शिक्षक बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करून ठेवली असल्याचे डॉ. जाखड यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या. शिक्षकांच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. याबाबतची माहिती वरिष्ठांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आली आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी ३०० शिक्षकांच्या, तर १२ ग्रामसेवकांच्या ना हरकत दाखले जिल्हा परिषदेकडे आलेले आहेत. मात्र, १० टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त असल्याने त्या शिक्षकांना सोडता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर कोरोना महामारीमुळे बदल्यांना स्थगिती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आठवडा बाजारामध्ये लसीकरण कॅम्प हे कोणाचीही परवानगी न घेताच लावण्यात आले होते. या प्रकरणामध्ये जिल्हा आरोग्याधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांचीही चौकशी होणार आहे. हे प्रकरण शासनाकडे पाठविण्यात आल्याचे डॉ. जाखड यांनी सांगितले.
सन २०२०-२१चा कोट्यवधींचा निधी अखर्चित
जिल्हा परिषदेला २०१९-२० या आर्थिक वर्षाचा १०५ कोटी रुपये; तर सन २०२१-२२ चा १५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. सन २०१९-२० चा केवळ ९५ कोटी रुपये निधी खर्च झाला असून, सन २०२१-२२ चा निधी अजूनही अखर्चित आहे; कारण बहुतांश पैसा हा वर्षाच्या शेवटच्या दिवसांत येत असल्याने हा निधी शिल्लक राहिला असल्याचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सांगितले.