रत्नागिरी : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जिल्ह्याचा एकूण ५ कोटी ४९ लाख ८० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील २६१ गावातील ४८६ वाड्यांचा संभाव्य पाणी टंचाईग्रस्तांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने अजूनही या कृती आराखड्याला मंजुरी दिलेली नाही.पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. त्याप्रमाणे यंदाही ५ कोटी ४९ लाख ८० हजार रुपयांचा हा आराखडा जिल्हा परिषदेने केला आहे.
आराखड्यानुसार येत्या उन्हाळ्यात ९८ गावातील २९३ वाड्यांना पाणीटंचाई भेडसावण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी ३३ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या आराखड्यामध्ये केवळ टंचाईग्रस्त गावांना टँकरने पुरवठा करण्यासाठी ३५ लाख ८५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.या आराखड्यानुसार विंधन विहिरी दुरुस्ती, विहिरीतील गाळ काढण्याचे यंदाच्या उन्हाळ्यामध्ये एकही पैसा खर्च करण्याची तरतूद करण्यात आलेली नाही. यंदाच्या आराखड्यानुसार लांजा तालुक्यात ८ गावातील ८ वाड्यांमध्ये टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. त्यासाठी टंचाई कृती आराखड्यामध्ये ४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.गतवर्षीच्या टंचाई कृती आराखड्यामध्ये एकही नवीन विंधन विहीर घेण्यात आलेली नव्हती. कारण विंधन विहिरींची कामे जिल्हा नियोजनमधून घेण्यात आली होती. मात्र, यंदा ११० गावातील १६२ वाड्यांमध्ये विंधन विहिरी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ९७ लाख २० हजार रुपयांची तरतूद आराखड्यामध्ये केली आहे. मात्र, याला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
या आराखड्यामध्ये नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी ४ कोटी १२ लाख ७५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ६४ नादुरुस्त योजनांची दुरुस्ती केली जाणार आहे.जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यंदाचा टंचाईकृती आराखडा मंजुरीसाठी सादर केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण कृती आराखडा मंजूर करण्याची अपेक्षा जिल्हा परिषदेकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, मागील इतिहास पाहता जिल्हा प्रशासनाकडून टंचाई कृती आराखड्यामध्ये मोठ्या प्रमाणात काटछाट करुन तो मंजूर करण्यात येतो.गावे, वाड्यांची संख्या कमीयंदा पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यताही कमी असल्याने गावे व वाड्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यात सुमारे ४५००पेक्षा जास्त वनराई, कच्चे बंधारे उभारण्यात आले आहेत. त्याद्वारे ग्रामीण भागात पाणी अडवण्यात आल्याने तेथील विहिरी व बंधाऱ्यांच्या आजूबाजूची पाण्याची पातळी वाढल्याने यंदा पाणीटंचाई कमी उद्भवणार हे निश्चित आहे.