फोटो ६ नाकाडे फोल्डरमध्ये फोटो सेव्ह आहेत.
- भरउन्हाळ्यात विजेअभावी पाणी पुरवठा बंद
- बागायतीचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तालुक्यातील डोर्ले येथील घयाळवडी ते खाेतमळी दरम्यान विजेचे १९ खांब पडले आहेत. परिणामी, परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज पुरवठा बंद असल्याने भरउन्हाळ्यात बागायतींना पाणी उपलब्ध होत नसल्याने पिके वाळू लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
डोर्ले येथील अजय तेंडूलकर यांच्या जागेत आंब्याची कलमे, सुपारी व नारळाची झाडे आहेत. शिवाय हापूस कलमांची नर्सरीही आहे. तेंडूलकर यांच्या बागायतीतून वीज वाहिन्या गेल्या आहेत. २७ मार्च रोजी १९ विजेचे खांब पडले असून, त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली असतानाही त्याकडे अद्याप दुर्लक्ष होत आहे; मात्र शेती व बागायतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होत आहे. प्रखर उन्हाळा असल्याने बागायती वाळू लागली आहे.
वास्तविक कोसळलेले खांब जीर्ण व खराब झाल्याबद्दल तेंडूलकर यांनी दीड वर्षांपूर्वीच महावितरणकडे तक्रार केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत विजेचे खांब बदलण्यात आलेले नाहीत; मात्र आता खांब कोसळून दहा दिवस लोटले तरी नवीन खांब टाकून वीज पुरवठा पूर्ववत करण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या आर्थिक नुकसानासाठी महावितरण जबाबदार असल्याची तक्रार तेंडूलकर यांनी केली आहे. नुकसान भरपाई महावितरणकडून मिळावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले आहे.