लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर तेथील बाधित कुटुंबांचे ताप्तुरते पुनर्वसन कंटेनरमध्ये करण्यात आले होते. येथे वीजपुरवठ्यापोटी ६६ हजारांची रक्कम थकीत होती. ती प्रशासनाकडून भरण्याचा निर्णय जिल्ह्याच्या दिशा समितीच्या बैठकीत झाला होता. वीजबिल माफ होणार असल्याने पुनर्वसित कुटुंबांनी खासदार तसेच राजकीय पुढाऱ्यांचा सत्कारही केला. मात्र, गेल्या दोन महिन्यांत पुढाऱ्यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली असून, बाधित कुटुबीयांना घरात अंधाराचा सामना करावा लागण्याचा धोका कायम आहे.
तालुक्यातील तिवरे धरणफुटीनंतर धरणाच्या पायथ्याशी असलेली भेंदवाडी जमीनदोस्त झाली. त्यानंतर पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाली. अलोरे येथे बाधित कुटुंबीयांसाठी घरांचे बांधकाम सुरू आहे. येत्या दीड-दोन महिन्यात घरांचे बांधकाम मार्गी लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी बाधित कुटुंबीयांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा काही कुटुंबीयांनी आपल्या नातेवाईकांकडे आसरा घेतला. तर काही लोकांची कंटेनरमध्ये निवास व्यवस्था करण्यात आली. या कंटेनरमध्ये महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात आला. मात्र, वीजबिल कोणी भरायचे यावरून थकीत वीजबिल वाढत गेले. थकीत बिलाची रक्कम जमा होत नसल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला होता. थकीत बिल भरण्यास बाधित कुटुंबांनी नकार दिला.
दोन महिन्यांपूर्वी खासदार विनायक राऊत तिवरे येथे गेल्यानंतर थकीत बिलाविषयी चर्चा केली. वीजबिलाचा भार बाधित कुटुंबांवर पडणार नसल्याचे त्यांनी आश्वासन दिले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या दिशा समितीच्या बैठकीत तहसील कार्यालयाने वीजबिल भरण्याचा निर्णय झाला व तशा सूचनाही देण्यात आल्या. वीजबिलाची झळ बसणार नसल्याने बाधित कुटुंबीयांनी खासदार तसेच स्थानिक पुढारी व लोकप्रतिनिधींचे सत्कार केले. वाडीत बिल माफ होणार असल्याची दवंडी पिटवण्यात आली. या घटनेला २ महिने झाले तरी थकीत बिलाचा पत्ता नाही. ६६ हजारांचे थकीत बिल आता ७० हजारांवर पोहोचले आहे. दिशा समितीने बिल भरण्याचा निर्णय घेतला असला, तरी अद्याप बाधित कुटुंबांना थकीत बिलाची दिशा मिळालेली नाही.
पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे यांनी गेल्या मासिक सभेत आपल्या गणातील थकीत बिलाचा मुद्दा मांडला होता. त्यावर बुधवारी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत महावितरणचे पालशेतकर यांनी सांगितले की, तिवरे येथील पुनर्वसन वसाहतीमधील थकीत बिलाची रक्कम महावितरणकडे जमा झालेली नाही. तसेच याविषयीचा पत्रव्यवहारही आमच्याकडे कोणी केलेला नाही.
--------------------------
तिवरे धरणफुटीनंतर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात राजकारण झाले. ते अजूनही सुरूच आहे. वीजबिल प्रशासन भरणार असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली होती. मात्र, तहसीलदारांच्या नावे असलेले ७० हजार ६०० रूपये थकीत वीजबिल बुधवारीच महावितरणकडून ग्रामस्थांना मिळाले आहे. थकीत बिलामुळे फेब्रुवारीत भर उन्हाळ्यात आठवडाभर वीजपुरवठा खंडित झाला होता. आता भर पावसाळ्यात बाधित कुटुंबांच्या घरात पुन्हा अंधार नको, एवढीच आमची अपेक्षा आहे.
- तानाजी चव्हाण, तिवरे