गुहागर : तालुक्यातील ताजुब मानवाडी ते खडपेवाडी या वाड्यांना जोडणाऱ्या डिगोली या पाऊलवाटेवरील सुमारे ८ ते १० विद्युत खांब धोकादायक झाले आहेत. ते केव्हाही कोसळून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून शेतकरी, मजूर, जनावरे यांची सातत्याने ये-जा असते. त्यामुळे खांबदुरुस्तीची मागणी होत आहे.
उष्णतेची लाट त्रासदायक
लांजा : तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढली आहे. अंगाची काहिली होत असून घामाच्या धारांनी नागरिकांना हैराण केले आहे. दिवसाबरोबर रात्रीही उकाडा असह्य होतो. वाढत्या तापमानामुळे आजारपणातही वाढ झाली आहे. दिवसेंदिवस उष्णता वाढू लागल्याने या लाटेने नागरिकांना बेजार केले आहे.
श्रेयस तांबेला सुवर्णपदक
खेड : येथील श्रेयस तांबे याने राष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाड या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवीत सुवर्णपदक मिळविले आहे. यापूर्वीही त्याने बालवैज्ञानिक स्पर्धा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली होती. शिष्यवृत्ती परीक्षेतही तो जिल्ह्यात दहावा आला आहे. त्याच्या या यशाबद्दल तालुक्यात अभिनंदन होत आहे.
महाविद्यालयात व्याख्यान
आवाशी : लवेल विभाग शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित अण्णासाहेब बेहरे ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘दहावीनंतर पुढे काय?’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी स्पर्धा परीक्षेसंदर्भात मोहन भिडे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन डॉ. अविनाश बेडेकर होते.
धुळीने आजार वाढले
देवरुख : तळेकांटे देवरुख मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे श्वसनाबरोबरच डोळ्यांचे आजारही वाढू लागले आहे. या मार्गावरील काम रखडल्याने नागरिकांना धुळीचा त्रास अधिक होत आहे. ठेकेदाराने कामाची गती वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
साठा संपुष्टात
पाली : संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला असून लांजा तालुक्यातील आंजणारी धरणात फक्त ५० टक्केच पाणी शिल्लक आहे. निवसर आणि हरचेरी येथील धरणे अजूनही भरलेली आहेत. औद्योगिक महामंडळाकडून ही धरणे उभारण्यात आली आहेत.
सेजसला देणगी
रत्नागिरी : सेवानिवृत्तांची जनसेवा समिती रत्नागिरीच्या आजीव सदस्य व निवृत्त शिक्षिका उषा भाटवडेकर यांनी समितीला ७,५०० रुपयांची देणगी दिली आहे. शहरातील बंदर रोड येथील मुरलीधर मंदिरात झालेल्या विभागीय सभेच्या वेळी त्यांनी ही देणगी अध्यक्ष वसंत झगडे यांच्याकडे सुपुर्द केली.
काजू बियांचा भाव घसरला
देवरुख : हवामानात होणारे सातत्याने बदल, किडीचा प्रादुर्भाव यांमुळे या वर्षी काजूचे उत्पन्न म्हणावे तसे हाती लागले आहे. त्यातच आलेल्या उत्पन्नाचा दरही घसरल्याने बाजू बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. तसेच राखणदार न मिळाल्याने अनेक बागायतींमधून काजू बियांची चोरी होत आहे.
कोरोनावर मार्गदर्शन
दापोली : सध्या कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. या अनुषंगाने येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी पालगड पंचक्रोशीतील नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यांनी विसापूर, खातलोली, शिरसाडी, सातेरे, आदी गावांत जाऊन शिमगोत्सवाच्या अनुषंगाने कशा प्रकारे दक्षता घ्यावी, यावर मार्गदर्शन केले.
अवैध धंद्यांना चाप
देवरुख : संगमेश्वर बाजारपेठेत अवैध धंद्यांना काही दिवसांपासून ऊत आला होता. मात्र संगमेश्वरातील एका महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केल्यानंतर या कार्यालयाकडून सूत्रे हलविण्यात आली. त्यामुळे संगमेश्वरातील हे अवैध धंदे बंद झाले आहेत. या धंद्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी होत आहे.