राजापूर : तालुक्यातील कोतापूर - घुमेवाडी येथील ३ वीजखांब तळाकडील बाजूने पूर्णत: गंजलेले असून, साईड कडांवरती उभे आहेत. त्यामुळे सदरचे पोल केव्हाही पडण्याची व त्यामुळे धोका उद्भवण्याची दाट शक्यता आहे.
वीजवाहक तारा एकमेकांना जोडल्या गेलेल्या असल्याने त्या आधारावर हे धोकादायक वीजखांब उभे आहेत. सुदैवाने नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात हे वीजखांब न कोसळता कोणतीही हानी पोहोचली नाही. घुमेवाडी येथील एकाच वाडीतील सचिन घुमे यांच्या घराच्या मागच्या बाजूला मेनलाईनमधील १ वीजखांब, भानू नाचणेकर यांच्या घरालगत असणारा वीजखांब तसेच अरविंद भातडे यांच्या घरासमोर रस्त्यालगत असणारा एक वीजखांब असे हे तिन्ही वीजखांब तळाकडील बाजूने पूर्ण गंजलेले आहेत. हे तिन्ही विद्युत खांब भर वस्तीत असल्याने वादळी पावसात किंवा येणाऱ्या पावसाळी हंगामात केव्हाही कोसळू शकतात. त्यामुळे होणारी जीवितहानी किंवा संभाव्य धोके, नुकसान टाळण्यासाठी या विद्युत खांबांची पाहणी करुन तातडीने हे पोल बदलण्यात यावेत, असे निवेदन महावितरणला शिवतेज प्रतिष्ठान, कोतापूर संस्थेमार्फत देण्यात आले आहे.