रत्नागिरी : जिल्ह्यातील एक लाख ६० हजार ८९२ ग्राहकांनी वेळेवर वीजबिले न भरल्यामुळे ५२ कोटी ९६ लाख २९ हजार रुपयांची थकबाकी आहे. महावितरणकडून वेळोवेळी वीजबिले भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्याला अल्प प्रतिसाद लाभत असल्याने अखेर थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७१४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
गतवर्षी मार्चपासून काही ग्राहकांनी वीजबिले न भरल्यामुळे थकबाकीच्या रकमेत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार ७० ग्राहकांकडे २३ कोटी ३८ लाख ७९ हजार, वाणिज्यिकच्या १४,६४५ ग्राहकांकडे ८ कोटी ४९ लाख १७ हजार, औद्योगिकच्या १,८०५ ग्राहकांकडे ३ कोटी ९८ लाख २२ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. कृषीच्या ४,१६० ग्राहकांकडे ७२ लाख ८९ हजार, पथदीपांचे १,५४३ ग्राहकांकडे ९ कोटी ७६ लाख ७३ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या १,३६५ ग्राहकांकडे ३ कोटी ३७ लाख ६९ हजार रुपयांची थकबाकी आहे.
चिपळूण विभागातील ४३,९६५ ग्राहकांकडे १५ कोटी ७१ हजार ८ रुपये थकीत आहेत. त्यापैकी ३६,५९५ ग्राहकांकडे ७ कोटी ७३ लाख १२ हजार, वाणिज्यिकच्या ४,३६३ ग्राहकांकडे ३ कोटी १५ लाख ८७ हजार, औद्योगिकच्या ४६२ ग्राहकांकडे १ कोटी ३२ लाख ९७ हजार, कृषीच्या १,२७१ ग्राहकांकडे २१ लाख २० हजार, पथदीपच्या २२९ ग्राहकांकडे १ कोटी ८१ लाख ६१ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या ३०५ ग्राहकांकडे १ कोटी २५ लाख रुपये थकबाकी आहे.
खेड विभागातील ४२,८८५ ग्राहकांकडे १३ कोटी २० लाख ४४ हजार रुपये थकबाकी आहे. पैकी ३५,९८७ घरगुती ग्राहकांकडे ५ कोटी ५२ लाख २ हजार, ३,४९९ ग्राहकांकडे १ कोटी ८० लाख ३८ हजार, औद्योगिकच्या ३९६ ग्राहकांकडे ९३ लाख ५० हजार, कृषीच्या १,३१० ग्राहकांकडे २२ लाख ८ हजार, पथदीपच्या ४६५ ग्राहकांकडे ३ कोटी १४ लाख ७९, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या ३९० ग्राहकांकडे एक कोटी ११ लाख ३४ हजार रुपयांची थकबाकी आहे.
रत्नागिरी विभागातील ७४,०४२ ग्राहकांकडे २४ कोटी ४ लाख ७७ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. पैकी ५९,४८८ ग्राहकांकडे १० कोटी १३ लाख ६४ हजार, वाणिज्यिकच्या ६,७८३ ग्राहकांकडे ३ कोटी ५२ लाख ९३ हजार, औद्योगिकच्या ९४७ ग्राहकांकडे १ कोटी ७१ लाख ७६ हजार, कृषीच्या १,५७९ ग्राहकांकडे २९ लाख ६१ हजार, पथदीपच्या ८४९ ग्राहकांकडे ४ कोटी ८० लाख ३३ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या ६७० ग्राहकांकडे एक कोटी २६ लाख १० हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.
----------------------------
वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकीची रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही. पुरवठा खंडित केलेल्या ठिकाणी परस्पर वीजपुरवठा जोडणे, शेजारी वा इतरांकडून वीज घेणे अथवा अनधिकृतपणे वीज वापरल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- विजय भटकर, मुख्य अभियंता, कोकण परिमंडल