पाचल : वादळी पावसातही वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्नशील राहत जीवाची बाजी लावणाऱ्या पाचल महावितरण कार्यालयातील कनिष्ठ शाखा अभियंता ऋषिकेश शेट्ये आणि कर्मचाऱ्यांचे काैतुक करण्यात येत आहे. भरपावसात ग्राहकांना विजेची समस्या भेडसावू नये, यासाठी ही सारी मंडळी कार्यरत हाेती.
तालुक्यात २२ जुलै राेजी मुसळधार पावसाने हजेरी लावली हाेती. वादळी पाऊस आणि त्यामुळे अर्जुना नदीला आलेल्या महापुरामुळे पाचल भागातील जनजीवन ठप्प झाले होते. अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून ताराही तुटल्या होत्या. रस्ते, शेती, पूल, मोऱ्या पाण्याखाली गेल्या होत्या. अशा कठीण परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करण्यात आले. त्यानंतर पाचल भागात तुफानी पाऊस सुरूच होता. मुसळधार कोसळणाऱ्या पावसातही वीजपुरवठा खंडित न हाेण्यासाठी शाखा अभियंता ऋषीकेश शेट्ये व त्यांचे सहकारी कार्यरत हाेते. पाचल महवितरण कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र, याबाबत कोणतीही तक्रार अथवा सबब न सांगता असलेल्या कर्मचाऱ्यांमधून जनतेला चांगली सेवा देण्याचा त्यांचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.